परभणी : सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे परभणी शहरातील प्रभाग क्रमांक १२ सहित अनेक प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. झोपडपट्टी भागात तर अक्षरशः कमरेएवढे पाणी घुसल्याने अनेकांच्या भिंती कोसळल्या, तर काहींच्या झोपड्यांची पत्रे उडाली. या सर्वांचे पंचनामे करून शासनाकडून अनुदान जाहीर करण्यात आले असले, तरी अद्याप पर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा झालेली नाही.
याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने आज तहसील कार्यालयावर जोरदार घेराव आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश गाढे यांनी केले. आंदोलनादरम्यान प्रशासनावर विशिष्ट लोकांच्या सांगण्यावरून अनुदान वितरित केल्याचा आरोप करण्यात आला. तसेच अतिवृष्टीग्रस्तांना तत्काळ अनुदान देण्याची मागणी करण्यात आली.
फलटण येथील डॉक्टर आत्महत्याप्रकरणी SIT चौकशी करा : ॲड. प्रकाश आंबेडकर
या वेळी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रशासनाने लवकरात लवकर अनुदान वितरित करावे, अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कुटे, महिला जिल्हाध्यक्ष सुनीता साळवे, माजी शहराध्यक्ष प्रमोद अंभोरे, जिल्हा सचिव कुमार गौरव तारु, माजी शहराध्यक्ष रणजीत मकरंद, तसेच प्रभाग क्रमांक १२ मधील रहिवासी सय्यद खदिर यांच्यासह प्रभागातील आणि शहरातील अनेक नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






