कोल्हापूर : “कांबळे यांनी निवडलेला कालखंड मोठा, गुंतागुंतीचा आणि वंचितांच्या स्वायत्त राजकारणाला नेस्तनाबूत करणाऱ्या प्रवृत्तींचा आहे. या विषयाला हात घालण्याचे धैर्य त्यांनी दाखवले असून ‘वंचितांचे राजकारण : एक मुक्त चिंतन’ हे पुस्तक म्हणजे वंचितांच्या राजकीय चळवळीचा दस्तऐवज आहे,” असे प्रतिपादन आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार ज. वि. पवार यांनी केले.
ते सिद्धार्थ कांबळे लिखित ‘वंचितांचे राजकारण : एक मुक्त चिंतन’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. शाहू स्मारक येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सीमा शुल्क अधिकारी मदन पवार होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. आलोक जत्राटकर, प्रा. डॉ. अमर कांबळे, बार्टीचे संशोधन अधिकारी प्रा. डॉ. संभाजी बिरांजे आणि वंचित आघाडीच्या डॉ. क्रांती सावंत उपस्थित होते.
साहित्यिक ज. वि. पवार पुढे म्हणाले, “पुस्तकाविषयी मी यापेक्षा अधिक काही बोलणार नाही, कारण मी बोललो तर तुम्ही वाचणार नाही. जो समाज वाचतो तोच वाचतो, जो समाज वाचत नाही तो वाचतच नाही.”
लेखक सिद्धार्थ कांबळे यांनी पुस्तकाविषयी बोलताना सांगितले की, “या देशातील वंचितांचे स्वायत्त राजकारण उद्ध्वस्त करण्यासाठी प्रस्थापित राजकारण्यांकडून खेळल्या जाणाऱ्या घाणेरड्या राजकारणाचे अवलोकन म्हणजे हे पुस्तक आहे.”
कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रीकांत कांबळे यांनी संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले. स्वागतप्रास्ताविक प्रा. रविराज कदम यांनी केले तर सूत्रसंचालन विजय काळे यांनी केले.






