– सुशांत कांबळे
आजपर्यंत राजकीय चर्चा-टीकेमध्ये आपण पाहतो की राज्यातील काँग्रेस आणि तत्कालीन राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व नेते वंचित बहुजन आघाडीबद्दल बोलताना नेहमी कुत्सितपणे बोलतात “तुमचे आमदार किती? तुमचे खासदार किती?” पण प्रश्न असा आहे की तुमच्याकडे अनेक आमदार-खासदार, मंत्री, सत्ता असताना तुम्ही जे करू शकला नाहीत, ते आज सुजात आंबेडकर यांनी करून दाखवले.
महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘भीष्म पितामह’ म्हणून ओळखले जाणारे शरद पवार असोत, काँग्रेसचे राहुल गांधी असोत किंवा इतर कुठल्याही राष्ट्रीय पक्षांचे नेते देशात कोणीही ज्याची हिंमत दाखवली नाही, ते RSS ला खुले आव्हान देण्याचे ऐतिहासिक कार्य आज सुजात भाईनी केले आहे.
केंद्रात किंवा राज्यात सत्ता असताना RSS ला शिंगावर घेणे हे कोण्या साध्या-सुध्या नेत्याच्या क्षमतेचे काम नाही. बाबासाहेबांचे रक्त कोणत्याही सत्तेच्या दबावाला भीक घालत नाही हे आज सुजात भाईनी ठासून दाखवून दिले.
नेहमी बौद्धिक फड मारणारे संघी नेते व कार्यकर्ते आज सुजात भाईना सामोरे जाण्यास तयार नव्हते. स्वतःला “अर्ध्या तासात सीमारेषेवर लढायला तयार” म्हणवणाऱ्या संघटनेने एवढा भित्रेपणा दाखवणे लाजिरवाणेच.
सुजात भाईनी दोन अतिमहत्त्वाचे प्रश्न मांडले:
1. RSS ची नोंदणी का नाही?संविधानाप्रमाणे गल्लीतल्या 20-25 तरुणांच्या मंडळाची सुद्धा नोंदणी आवश्यक असते. मग लाखो स्वयंसेवक असलेल्या RSS ची कायदेशीर नोंदणी का नाही? जर RSS म्हणते की “आम्ही बाबासाहेबांना पूज्य मानतो, संविधान पाळतो”, तर मग संविधानातील कायद्यानुसार नोंदणी का टाळली?
2. शस्त्रांचा परवाना कुठे आहे?आर्म्स ॲक्टनुसार देशात विनापरवाना शस्त्र बाळगणे गुन्हा आहे. मग RSS कडे असलेली शस्त्रे कुठून आली? त्यांची नोंदणी कोणाकडे आहे? आणि जर शस्त्रांची नोंदणीच नाही तर त्यांचा गैरवापर करून कोणताही गुन्हा घडवता येऊ शकतो ज्याचा पुरावा उरत नाही.
याचा स्पष्ट अर्थ — RSS देशाचा कायदा पाळत नाही. शस्त्र नोंदणीसाठी कायदेशीर जबाबदारी टाळण्यासाठीच संघटनेची नोंदणी टाळली गेली हे आज सुजात आंबेडकर यांनी उघड केले.
ही हिंमत महाराष्ट्रातील सर्व सामाजिक-राजकीय संघटनांनी दाखवायला हवी होती. परंतु आज ती सुजात आंबेडकर यांनी दाखवली. एवढ्यापुरतेच नव्हे, मोर्च्याचे नियोजन, सुरक्षा, शिस्त, संदेश सर्व काही अत्यंत जबाबदारपणे पार पडले.पोलिसांनी परवानगी नाकारली पण वंचित बहुजन आघाडीनं सांगितलं:
“मोर्चा नक्की होणार!” आणि तो झाला. शिस्तीत, ठामपणे, निर्भीडपणे मोर्चा यशस्वी केला.
कोणतेही असामाजिक घटक मोर्च्यात घुसून आंबेडकरी समाजाला बदनाम करू नयेत. यासाठी केलेली काटेकोर व्यवस्था पाहून बाळासाहेब आंबेडकरांचा संघटनात्मक अनुभव सुजात भाईनी आत्मसात केला असल्याचे स्पष्ट दिसून आले.
भविष्यात जेव्हा RSS बद्दल इतिहास लिहिला जाईल, तेव्हा हा दिवस विशेष अधोरेखित करावा लागेल. कारण “बाबासाहेबांच्या पणतूने आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या सुपुत्राने निर्भीडपणे RSS ला उघड प्रश्न विचारले” हे इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवले जाईल.
निरंकुश सत्तेच्या छाताडावर उभे राहून प्रश्न विचारण्याची ही धमक आंबेडकरी विचारांची खरी परंपरा आहे. आणि त्या परंपरेच्या मागे आज समस्त आंबेडकरी तरुणाई ठामपणे उभी आहे. ही घटना खऱ्या अर्थाने ऐतिहासिक आहे.





