औरंगाबाद : वंचित बहुजन युवा आघाडीचे औरंगाबाद पश्चिम शहराध्यक्ष राहुल मकासरे यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) कार्यकर्त्यांना औरंगाबाद येथील पॉलिटेक्निक कॉलेजसमोर परवानगीशिवाय स्टॉल लावण्यापासून रोखले होते.
या घटनेनंतर RSS ने राहुल मकासरे यांच्याविरोधात FIR दाखल केली असून, राहुल यांच्यावर अजामीनपात्र गुन्ह्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणावरून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या अधिकृत ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) हँडलवर ट्विट करत पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राहुल मकासरे यांनी फक्त ‘तुमच्याकडे परवानगी आहे का?’ एवढाच प्रश्न विचारला होता आणि ते कोणत्याही हिंसाचारात सामील नव्हते, तरीही त्यांच्यावर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला, हे पोलिसांच्या ‘मनुवादी वृत्ती’चे द्योतक असल्याचे आंबेडकर यांनी म्हटले आहे.
आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे की, RSS ही वंचित बहुजन आघाडीच्या फुले, शाहू आणि आंबेडकरी विचारधारेला घाबरते. त्यांनी जाहीर केले आहे की, वंचित बहुजन आघाडी राहुल मकासरे यांच्यासोबत खंबीरपणे उभी आहे.
तसेच, औरंगाबाद वंचित बहुजन आघाडी टीमला निर्देश देण्यात आले आहेत की, ज्या तपास अधिकाऱ्याने राहुल यांच्याविरोधात खोटी FIR दाखल केली आहे, त्याच्याविरोधात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत (SC/ST Act) गुन्हा दाखल करावा.आपला देश फुले, शाहू आणि आंबेडकरी विचारधारेने चालेल, मनुवादाने नाही! असे ठाम मत ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ट्विटच्या शेवटी मांडले आहे.