मुंबई : रामदास आठवले जर तुम्हाला बाबासाहेबांच्या विचारांची चिंता असेल तर तुमच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्या; तुमचा गट वंचित बहुजन आघाडीत विलीन करा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष सर्वजित बनसोडे यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना दिले आहे.
दोन दिवसांपासून खासदार रामदास आठवले सातत्याने वंचित बहुजन आघाडी, नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या विषयी एकत्र येण्यासंदर्भात भाष्य करत आहेत, त्यांना माझा सवाल आहे की, त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नाचे रक्षण करण्याऐवजी आरपीआयमध्ये फूट पाडून स्वतःचा स्वतंत्र गट निर्माण केला आहे.
जर रामदास आठवले यांना ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे असेल, तर पहिले त्यांनी आपले मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा आणि आरपीआय गटाचा भाजपशी असलेला संबंध तोडावा.
जर आंबेडकरी ऐक्याचा खरा विचार असेल, तर आरपीआयमधून फूट पाडून तयार झालेला त्यांचा गट वंचित बहुजन आघाडीत विलीन करावा.
भविष्यातील निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली काम करण्याची प्रतिज्ञा करावी, असे आवाहन सर्वजित बनसोडे यांनी दिले आहे.