संजीव चांदोरकर
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव ४००० डॉलर्स प्रति औंस पोहोचला आहे. म्हणजे ३,५०,००० रुपये. (एक औंस म्हणजे २८ ग्रामपेक्षा थोडे जास्त) म्हणजे भारतात एका दहा ग्रॅम/ तोळा १,२५,००० रुपये.
(शेयर मार्केटचे निर्देशांक, क्रिप्टो, डॉलरचा भाव, पर्यावरणीय मृत्यू, युद्धातील नरसंहारातील मृत्यू….. यांचे नवनवे ऐतिहासिक उच्चांक. सोने म्हणत आहे की मी का मागे राहू?
फक्त या वर्षाच्या जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत तो ४७ टक्क्यांनी वाढला आहे.
सोन्याचे भाव वाढण्यामागे सणासुदीचे दिवस, भारतीय लोकांमध्ये असणारे सोन्याचे वेड ही कारणे आपल्या मनात रुजवली गेली आहेत. ही कारणे आहेत. पण ती दुय्यम आहेत.
त्यातील महत्वाची ढकलशक्ती आहे अलीकडच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात देशोदेशींच्या केंद्रीय बँकानी (सेंट्रल बँकांनी) चालवलेली धडाकेबाज खरेदी !
सामान्य नागरिकांनी केलेली सोने खरेदी आणि देशांच्या केंद्रीय बँकांनी केलेली सोने खरेदी यामागील कारणे पूर्णपणे भिन्न असतात.
केंद्रीय बँका त्यांच्याकडील अतिरिक्त पैसे कोठे ना कोठे गुंतवतच असतात. त्यांच्याकडील “रिझर्व मनी”चा काही भाग या बँका सोन्यात नेहमीच गुंतवलेला असतो हे खरे. पण आज जे घडत आहे ते वेगळं आहे. खरेदीचे प्रमाण नॉर्मल की अपवादात्मक मोठे हा निकष लावला पाहिजे.
ज्यावेळी या केंद्रीय बँका मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी करू लागतात त्यावेळी त्यांना भविष्यामध्ये जी अनिश्चितता दिसत असते त्याला एक प्रकारचे विमा कव्हर म्हणून त्या बँका सोने साठवू लागतात. विमा कव्हर!
सोने हे ज्ञात काळापासून एक भरवशाचे रिझर्व ॲसेट मानले गेले आहे.
याआधी देखील १९३० मधील महामंदी, १९७० च्या सुरुवातीला तेल उत्पादक ओपेक देशांनी तेलाचे भाव एका रात्रीत काही पटीने वाढवून आणलेली अनिश्चितता, २००८ मधील सब प्राईम अरिष्ट…. अशा प्रत्येक वेळी केंद्रीय बँकांनी मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी केली.
या ऐतिहासिक प्रकाशात सध्याची खरेदी बघावयास हवी की मग त्याचे वेगळे अर्थ लागतात
जगातील अनेक केंद्रीय बँका, अमेरिकेसारख्या बलाढ्य अर्थव्यवस्थेच्या आणि अमेरिकेच्या स्थिर डॉलर मध्ये आपले रिझर्व मनी गुंतवत असतात. त्यातून त्यांना व्याज आणि भांडवली नफ्यातून काहीतरी परतावा देखील मिळत असतो.
पण डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या राजवटीत आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भूराजनैतिक संबंधात तयार झालेली अनिश्चितता, अमेरिकन अर्थव्यवस्थेबद्दल विश्वास डळमळीत होणे, अमेरिकन डॉलरचे वर्षभरात दहा टक्क्यांनी घसरणे, जपान, फ्रान्स मधील राजकीय अनिश्चितता अशा अनेक कारणांमुळे या केंद्रीय बँका सोन्यामध्ये सुरक्षितता शोधत आहेत. यात आशिया, मध्यपूर्व आणि युरोपियन देशांमधील केंद्रीय बँका आघाडीवर आहेत.
अजून एक नवीन आयाम पूर्वी सोने खरेदीमध्ये सोन्यावर आधारित एक्सचेंज ट्रेडेड फंड्स (ETF) अस्तित्वात नव्हत. आता या फंडामध्ये विविध प्रकारचे गुंतवणूक फंडस्, अनेक हाय नेटवर्थ गुंतवणूकदार व्यक्ती मोठ्या प्रमाणावर भांडवल ओतत आहेत. त्याचा मोठा परिणाम भावावर झाला आहे.
जगातील सर्व शेअर मार्केटचे निर्देशांक उच्चांकावर असताना, अशा अभद्र पोष्टी लिहिणाऱ्यांवर नाके मुरडली जातील हे मला माहित आहे. ही पोस्ट भविष्याचा वेध घेताना, माहिती , आकडेवारी गोळा करून स्वतःची बुद्धी वापरणाऱ्यांसाठी आहे. हीच मेथोडोलोजी भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी देखील लागू पडत असते.
ICC महिला वनडे वर्ल्ड कप २०२५: टीम इंडियाची ऑस्ट्रेलियाशी होणार ‘महामुकाबला’; कधी आणि कुठे खेळणार?
आयसीसी महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ मध्ये भारतीय महिला संघाने कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात दमदार सुरुवात केली. भारताने श्रीलंका आणि...
Read moreDetails