मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून शासनाच्या निर्णयामुळे प्रचंड धक्का बसल्याने, ओबीसी समाजाचे निष्ठावान कार्यकर्ते आणि ओबीसी योद्धा म्हणून ओळखले जाणारे विजय बोचरे यांनी दि. ९ ऑक्टोबर रोजी आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे ओबीसी समाजात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. (prakash ambedkar)
विजय बोचरे यांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात त्यांना धीर देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या पत्नी अंजलीताई आंबेडकर यांनी बोचरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
यावेळी आंबेडकर दांपत्याने बोचरे कुटुंबाचे सांत्वन केले आणि त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी आरक्षणासाठी आपण सदैव ओबीसी बांधवांसोबत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले. (prakash ambedkar)
ओबीसी बांधवांना आवाहन :
विजय बोचरे यांच्या बलिदानानंतर वंचित बहुजन आघाडीने ओबीसी बांधवांना तीव्र शब्दांत जागे होण्याचे आवाहन केले आहे. “ओबीसी बांधवांनो जागे व्हा! आम्ही आमचा एक बांधव गमावला आहे, अजून किती वाट पाहताय?” असा सवाल उपस्थित करत, या निबरगट शासनाला जागे करण्यासाठी आता लढा देणे अपरिहार्य असल्याचे म्हटले आहे. (prakash ambedkar)
“आमच्या न्याय आणि हक्कासाठी आम्हाला लढावेच लागेल. सर्व ओबीसी बांधवांनी जागे व्हा. आमचे जीवन एवढे स्वस्त आहे का?” असे आवाहनही वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी केले आहे.