सोलापूर : बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याद्वारे स्थापित द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि भारतीय बौद्ध महासभा यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण भारतभर सुरू असलेल्या वर्षावास व्याख्यान मालिकेची सांगता झाली. राष्ट्रीय संरक्षिका महाउपासिका आदरणीय मीरा आंबेडकर आणि राष्ट्रीय सल्लागार श्रद्धेय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनानुसार ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती.
मांडेगाव, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर येथील जय भीम बुद्ध विहारात या वर्षावासातील शेवटचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सोलापूर महिला सरचिटणीस मॅडम नंदा काटे यांनी ‘बुद्ध धम्म आणि मानवतावाद’ या विषयावर उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केले. तालुका संघटक ज्ञानदेव सोनवणे गुरुजी यांनी बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात केली.
कार्यक्रमात शहराध्यक्ष रमेश पालके सर, कदम सर, नंदा काटे मॅडम, आणि ज्ञानदेव सोनवणे गुरुजी यांच्या हस्ते बुद्ध रूपाला पुष्प वाहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
‘क्रांती आणि प्रतिक्रांती’ पुस्तकाचे वाचन करणाऱ्या करुणा सोनवणे यांचा सत्कार
वर्षावासानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘क्रांती आणि प्रतिक्रांती’ या महत्त्वाच्या ग्रंथाचे वाचन करणाऱ्या आ. करुणा सोनवणे यांचा सत्कार बार्शी तालुका अध्यक्ष जानराव यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाला गावातील मान्यवर जसे की तलाठी जाधवर मॅडम, ग्रामसेवक इंगळे सर, आणि पोलीस पाटील यांनी जय भीम बुद्ध विहाराला भेट देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
बोधी वृक्षारोपण आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचे आवाहन
याप्रसंगी कालकतीत दशरथ अंकुश सोनवणे यांच्या स्मरणार्थ, त्यांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत बोधि वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष रामलिंग सोनवणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना केवळ मूर्तीत न पाहता त्यांच्या पुस्तकांत पाहिले पाहिजे. त्यांनी आव्हान केले की, ‘क्रांती आणि प्रतिक्रांती’ पुस्तकाचे वाचन जसे सुरू आहे, तसेच वर्षभर लहान मुलांना शिकवण्याची जबाबदारी सर्वांनी घ्यावी.
ते म्हणाले की, दशरथ अंकुश सोनवणे गुरुजी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ बोधी वृक्षारोपण करण्यामागे हेच उद्दिष्ट आहे की, आपण सर्वांनी अंधश्रद्धा सोडून द्यावी. अंधश्रद्धा सोडणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
जय भीम बुद्ध विहार, मांडेगाव कार्यकारणीने भविष्यातही असेच नवीन उपक्रम राबवण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रमाला विश्वास वाघमारे, शंकर जाधव, मंगल सोनवणे, शोभा सोनवणे, रेखा सोनवणे, उर्मिला सोनवणे यांच्यासह गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते.