नागपूर : नागराज मंजुळे दिग्दर्शित आणि सुपरस्टार अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘झुंड’ चित्रपटातील युवा अभिनेता प्रियांशू ठाकूर उर्फ बाबू छेत्री याची नागपूरमध्ये निर्घृण हत्या करण्यात आल्याने चित्रपटसृष्टीसह परिसरात खळबळ उडाली आहे. मंगळवारी (७ ऑक्टोबर) मध्यरात्री १२० ते ३ वाजेच्या सुमारास ही थरारक घटना घडली.
२२ वर्षीय बाबू छेत्रीची हत्या वैयक्तिक वादातून झाल्याचा पोलिसांना प्राथमिक संशय असून, याप्रकरणी त्याच्या एका मित्राला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नेमकी काय घडली घटना?
जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नारा परिसरामध्ये बाबू छेत्रीचा जखमी अवस्थेत मृतदेह आढळून आला. जरीपटका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री ३ वाजण्याच्या सुमारास हत्येची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांना बाबू छेत्री हा वायरने बांधलेला, तसेच त्याच्या शरीरावर चाकूसारख्या धारदार शस्त्रांचे अनेक वार झालेले दिसले. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. बाबूची बहीण शिल्पा छेत्री यांच्या तक्रारीवरून जरीपटका पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांचा मित्रावर संशय :
बाबूच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ ऑक्टोबरच्या रात्री १०.३० वाजता त्याचा एक मित्र त्याला सोबत घेऊन गेला होता. याच मित्रावर आता पोलिसांना संशय आहे.
पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात असेही समोर आले आहे की, मृत बाबू छेत्रीची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती आणि हत्येच्या वेळी तो दारूच्या नशेत होता. बाबू हा नागपुरातील लुंबिनी नगर, मेकोसाबाग परिसरात राहत होता, तर संशयित आरोपी जवळच्याच परिसरातील आहे.
अभिनयातून मिळाली होती नवी ओळख
नागपूरच्या झोपडपट्टीतील मुलांना घेऊन नागराज मंजुळेंनी ‘झुंड’ चित्रपट तयार केला होता. समाजसेवक विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात बाबूने एका फुटबॉल खेळाडूची महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. चित्रपटातील भूमिकेमुळे त्याला नवी ओळख मिळाली होती, मात्र त्याचा अचानक झालेला अंत चाहत्यांना आणि सहकलाकारांना हळहळ लावून गेला आहे.