नवी मुंबई : ऐरोली येथील श्रीमती सुशीलादेवी देशमुख विद्यालयातील विद्यार्थिनीच्या कथित आत्महत्या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने थेट विद्यालयाच्या मुख्याध्यापकांची भेट घेतली आणि या प्रकरणातील आरोपी शिक्षिकेला तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली.
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अश्वजीत जगताप यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ मुख्याध्यापकांना भेटले. विद्यार्थिनीच्या आत्महत्येला कारणीभूत असलेल्या शिक्षिकेवर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि तिला तत्काळ सेवेतून निलंबित केले पाहिजे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली. न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवणार असल्याचेही पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
यावेळी शिष्टमंडळात महिला जिल्हाध्यक्षा शिल्पा रणदिवे यांच्यासह कविता हिवाळे, सुरेखा वानखेडे, मनिकरणा लाटे, निर्मलाताई गमरे, संदीप वाघमारे, राजेश भालेराव, मल्लिनाथ सोनकांबळे, संभाजी वाघमारे, महेश भालेराव, सतीश भोसले, सहदेव मस्के इत्यादी प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.