-धनंजय कांबळे
१४ ऑक्टोबर १९५६ हा भारतीय इतिहासातील एक अद्वितीय दिवस. नागपूरच्या दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांसह डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला आणि भारतीय समाजजीवनात अभूतपूर्व परिवर्तनाची दिशा ठरवली. आज या ऐतिहासिक घटनेला साडेसहा दशकांहून अधिक काळ लोटला आहे; मात्र तिच्या सामाजिक आणि राजकीय परिणामांचा मागोवा घेतला तर ती अजूनही प्रासंगिक ठरते.
डॉ. आंबेडकरांनी धर्मांतराचा विचार हा आकस्मिकपणे केलेला निर्णय नव्हता. १९३५ मध्ये येवला मुक्कामी त्यांनी धर्मांतराची घोषणा केली, १९३६ मध्ये “मुक्ती कोण पथे?” या ऐतिहासिक भाषणातून अस्पृश्य समाजाला नवा मार्ग दाखवला, १९४१ मध्ये बुद्धजयंतीचे राजकीय महत्त्व अधोरेखित केले, १९४६ मध्ये ‘सिद्धार्थ कॉलेज’ सुरु करून बुद्धाच्या नावाला शैक्षणिक अधिष्ठान दिले, तर १९५० च्या दशकात जागतिक बौद्ध परिषदांमध्ये सहभागी होत बौद्ध विचारांच्या सार्वभौमिकतेला मान्यता मिळवून दिली. या साऱ्या घटनांचा परिपाक म्हणजे १४ ऑक्टोबर १९५६ चा धम्मदीक्षा सोहळा.
बाबासाहेबांचा हा निर्णय केवळ धार्मिक बदल नव्हता; तो सामाजिक-सांस्कृतिक क्रांतीचा उद्घोष होता. अस्पृश्यतेच्या अभिशापातून मुक्त होऊन, माणूस म्हणून जगण्याचा स्वाभिमान मिळवण्यासाठी त्यांनी बुद्धाचा मार्ग दाखवला. ज्यांना सावलीचा विटाळ मानला जात होता, त्याच लोकांनी ज्ञान, विज्ञान, शिक्षण आणि संस्कारांचा वारसा स्वीकारून आत्मसन्मानाने उभं राहण्याची ताकद मिळवली.
आज आपण पाहतो की, शिक्षण, उद्योग, विज्ञान, कला, साहित्य या प्रत्येक क्षेत्रात बहुजन समाजाचे व्यक्तिमत्त्व उभे राहिले आहे. ही बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीचीच देण आहे. पण याचवेळी एक कटू वास्तवही आपल्यासमोर उभे आहे—समाजात संकुचितपणा, कुटुंबापुरता मर्यादित विचार आणि राजकीय बेफिकिरी वाढली आहे. बाबासाहेबांनी केलेली क्रांती अर्धवट राहिल्याचे चित्र दिसते. आज आपलेच काही स्वतःला सुशिक्षित समजणारे लोक ज्यांनी हजारो वर्षे आमच्या अनेक पिढ्यांवर अन्याय अत्याचार केले, त्यांच्यासोबत मांडवली करून बाबासाहेबांनी दिलेला स्वाभिमान गहाण ठेवत आहेत. त्यांची राजकीय भूमिका दोलायमान दिसते, ते प्रस्थापितांची खुशमस्करी करण्यात व्यस्त आहे.
काही लोकांना आपण बौद्ध आहोत हे सांगण्याचीही लाज वाटते. ते निवडणुकीच्या राजकारणात स्वाभिमान गहाण ठेवून समाजात संभ्रम निर्माण करणाऱ्या लोकांना पाठिंबा देऊन बाबासाहेबांच्या विचारधारेशी प्रतारणा करीत आहेत. प्रस्थापितांचा अजेंडा राबवित आहेत. बहुजन हिताय बहुजन सुखाय असा संदेश तथागत गौतम बुद्धांनी दिला तोच विचार घेऊन ॲड. बाळासाहेब आंबेडकर सर्व वंचित शोषित समूहांना सोबत घेऊन त्यांच्या उद्धारासाठी त्यांना सत्तेत वाटा मिळाला पाहिजे यासाठी बहुजनांचे स्वतंत्र स्वाभिमानी राजकारण आणि समाजकारण करत आहेत. त्यांना सर्व वंचित बहुजन समाजाने साथ दिली पाहिजे.
बौद्ध धम्माचा स्वीकार म्हणजे फक्त पूजा-अर्चा नाही. तो प्रबुद्ध होण्याचा प्रवास आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जसा सामाजिक व सांस्कृतिक क्रांतीचा मार्ग दाखवला, तसाच राजकीय ओळखीचा वारसा दिला. आज बहुजन समाजाने केवळ शिक्षण व संस्कारात प्रगती करून थांबता कामा नये; तर ठाम राजकीय भूमिका घेऊन सत्ताधारी जमात होणे ही काळाची गरज आहे. अन्यथा बाबासाहेबांचे स्वप्न अपुरेच राहील, हे ध्यानात घेतले पाहिजे. म्हणूनच आज, धम्मचक्र प्रवर्तन दिनी आपण स्वतःला विचारलं पाहिजे, आपण खरंच बाबासाहेबांचे क्रांतीचे चक्र गतिमान केले आहे का? की ते अर्ध्यावरच थांबवले आहे? हे चक्र पुन्हा फिरवण्याची जबाबदारी शिकलेल्या पिढीवर आहे. आत्मसन्मान जागवून, एकत्रित भूमिका घेऊन, स्वाभिमानी नेतृत्व ओळखून आपण जर एकसंधपणे पुढे सरसलो, तरच धम्मक्रांतीचा उद्देश साध्य होईल. धम्मचक्र गतिमान करणे हेच खरे बाबासाहेबांना अभिवादन ठरेल.