अकोला : अकोल्यात आज सायंकाळी ६ वाजता क्रिकेट क्लब मैदान, रेल्वे स्टेशन रोड येथे होणाऱ्या ऐतिहासिक धम्म मेळाव्याची सर्वत्र उत्सुकता आहे. तब्बल ४० वर्षांची परंपरा लाभलेला हा मेळावा धम्म, समता आणि आंबेडकरी चळवळीच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण पर्व मानला जातो.
या मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक ॲड. बाळासाहेब आंबेडकर असून त्यांच्या भाषणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. सामाजिक न्याय, आरक्षण, वंचितांचे प्रश्न, तसेच सध्याच्या राजकीय घडामोडींवर ते कोणती दिशा दाखवतात याबाबत मोठी उत्सुकता आहे.
प्रत्येक वर्षी होणाऱ्या या धम्म मेळाव्याला विदर्भासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनुयायी मोठ्या संख्येने हजेरी लावतात. हजारो कार्यकर्ते, अनुयायी आणि नागरिक उपस्थित राहून या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होणार आहेत.
अकोल्यातील हा मेळावा केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रम नसून सामाजिक परिवर्तनाच्या विचारांना बळ देणारा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरतो. ४० वर्षांचा हा प्रवास समाजातील वंचित, पीडित आणि शोषित घटकांना एकत्र आणण्याचा आणि बुद्ध-आंबेडकरी विचारधारेचा प्रसार करण्याचा साक्षीदार राहिला आहे.