औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबाद येथील बुद्ध लेणीच्या पायथ्याशी आयोजित करण्यात आलेल्या धम्मचक्र प्रवर्तन मेळाव्यात सहभाग घेतला. या ऐतिहासिक स्थळाच्या ठिकाणी दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिन आयोजित केला जातो.
यावेळी बोलताना ॲड. आंबेडकरांनी गेल्यावर्षी बुद्ध विहाराला ‘अतिक्रमण’ ठरवून पाडण्याचा डाव नागरिकांच्या एकजुटीमुळे हाणून पाडल्याची आठवण करून दिली. त्यांनी ही एकजुटता कायम ठेवण्याचे आवाहन देखील उपस्थितांना केले.
‘हिंमत आणि चारित्र्य’ यशाची गुरुकिल्ली
कुठलेही यश मिळवण्यासाठी हिंमत आणि चारित्र्य या दोन गोष्टींची आवश्यकता असते, असे मत ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, या दोन बळावर कोणताही लढा यशस्वी करता येऊ शकतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही याच दोन गोष्टींच्या जोरावर समाजाला गुलामगिरीतून मुक्त केले.
तसेच ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय आवाहन केले. त्यांनी नागरिकांना त्यांची ही ताकद वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे कायम ठेवण्यास सांगितले. “तुम्ही पाठिंबा दिल्यास बुद्ध लेणीला कोणीही हात लावू शकणार नाही,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.