लेखक – आकाश मनिषा
संतराम इतिहासाच्या प्रवाहात काही घटना आणि काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात की ज्यांनी फक्त एका समाजाचा नव्हे तर संपूर्ण मानवजातीचा मार्गच बदलून टाकला. इ.स.पूर्व सहाव्या शतकात गौतम बुद्धांचा उदय हा तसाच एक अद्वितीय टप्पा ठरला. कपिलवस्तूच्या राजवाड्यातील वैभव, सुखसोयी, ऐश्वर्य बाजूला सारून सिद्धार्थाने जेव्हा मानवी दुःखमुक्तीच्या शोधासाठी गृहत्याग केला, तेव्हा कुणालाच कल्पना नव्हती की हा तरुण पुढे ‘बुद्ध’ होऊन मानवजातीच्या इतिहासात नवे पर्व निर्माण करणार आहे. बोधिवृक्षाखाली ध्यानस्थ झाल्यावर जेव्हा त्यांनी दुःखाचे कारण आणि त्याचा नाश करण्याचा मार्ग शोधून काढला, तेव्हा त्यांनी दिलेला उपदेश हा फक्त धार्मिक नव्हता; तो विज्ञानाधिष्ठित, तर्कसंगत आणि मानवकेंद्री जीवनमार्ग होता.
धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणजे त्या दिव्य क्षणाची आठवण आहे, जेव्हा सारनाथाच्या ऋषिपत्तन येथे बुद्धांनी प्रथमच पाच भिक्खूंना चार आर्यसत्ये आणि अष्टांगिक मार्ग सांगून धम्मचक्र प्रवर्तन केले. ही घटना भारतीय उपखंडासोबतच संपूर्ण जगाच्या इतिहासातील क्रांतिकारी टप्पा ठरली. त्या काळातील समाज वेदवादी कर्मकांड, यज्ञयाग, जातीव्यवस्था, अंधश्रद्धा आणि अस्पृश्यतेच्या बेड्यांनी जखडलेला होता. सामान्य माणूस असहाय, शोषित आणि दुःखग्रस्त जीवन जगत होता. अशा वेळी बुद्धांनी लोकांना सांगितले की दुःख हा जीवनाचा अनिवार्य भाग आहे, परंतु त्याचे मूळ अज्ञान आणि तृष्णेत आहे. दुःखातून मुक्ती ही देवपूजेमुळे नव्हे, तर प्रज्ञा, संयम आणि करुणामय आचरणामुळे मिळू शकते.
बुद्धांनी जीवनातील वास्तव समजून घेण्यासाठी चार आर्यसत्ये मांडली. जन्म, जरा, व्याधी, मरण, प्रियापासून वियोग आणि अप्रियाचा संयोग ही सर्व दुःखे आहेत. या दुःखांचे कारण तृष्णा आहे. तृष्णेचे उच्चाटन केल्यास दुःख नष्ट होते आणि त्यासाठी अष्टांगिक मार्ग हे साधन आहे. या आठ घटकांत सम्यक दृष्टि, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक प्रयास, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी यांचा समावेश आहे. हा मार्ग म्हणजे नैतिकता, प्रज्ञा आणि समाधी यांचा त्रिसंघ आहे. या मार्गाने व्यक्तीच्या जीवनात अंतःशांती निर्माण होते, समाजात समता निर्माण होते आणि राष्ट्राच्या जीवनात स्थैर्य प्रस्थापित होते.
बुद्धांनी सामान्य जनतेसाठी पंचशील या नैतिक नियमांची शिकवण दिली. प्राणीहिंसा न करणे, चोरी न करणे, असत्य न बोलणे, व्यभिचार न करणे आणि मादक पदार्थांचा त्याग करणे हे पंचशील आजच्या काळातही तितकेच महत्त्वाचे आहेत. जर समाजाने हे नियम आचरणात आणले, तर हिंसा, भ्रष्टाचार, व्यसनाधीनता आणि अन्याय आपोआप नष्ट होतील. धम्माची ही वैशिष्ट्ये म्हणजे त्याची तर्काधिष्ठितता, मानवतावाद, लोकशाही वृत्ती, स्त्री-पुरुष समानता, करुणा आणि मैत्री. बुद्धांनी सांगितले की माझ्या सांगण्यावर विश्वास ठेवू नका, तपासून पाहा, अनुभवून घ्या. हा विवेकाचा आग्रह धम्माला केवळ धार्मिक उपदेश न ठेवता तो विज्ञानाधिष्ठित मार्ग बनवतो. सारणाथातील धम्मचक्र प्रवर्तन ही केवळ धार्मिक घटना नव्हती, तर ती एक सामाजिक क्रांती होती. त्या क्षणापासून मोक्ष हा कोणत्याही जातीचा वारसा राहिला नाही.
श्रमण–भिक्खू परंपरेत सर्वांना समान स्थान मिळाले. समाजात बंधुभाव, समता आणि न्याय या मूल्यांची पायाभरणी झाली. बुद्धांच्या २५० वर्षांनंतर सम्राट अशोकाने धम्माला राजधर्म मानून आशिया खंडात त्याचा प्रसार केला. स्तूप, विहार आणि शिलालेखांच्या माध्यमातून बुद्धविचार सार्वत्रिक झाले. श्रीलंका, म्यानमार, थायलंड, चीन, जपान, कोरिया, नेपाळ, तिबेट अशा देशांत बौद्ध संस्कृती रुजली. आधुनिक काळातही बुद्ध धम्माने प्रेरणा दिली. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि सामाजिक चळवळीत त्याचे मूल्ये आधारस्तंभ ठरले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यतेच्या अंधारातून समाजाला मुक्त करण्यासाठी आणि त्यांच्या जीवनात उजेड पाडण्यासाठी बुद्ध धम्माचा स्वीकार केला.
१४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे लाखो अनुयायांसह त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारून नव्या युगाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “बुद्ध आणि त्यांचा धम्म हा मानवमुक्तीचा एकमेव मार्ग आहे.” त्यामुळे आज धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणजे फक्त ऐतिहासिक स्मरण दिवस राहिलेला नाही, तर तो बहुजन समाजाच्या आत्मसन्मानाचा आणि पुनरुत्थानाचा दिवस आहे. आज जग युद्ध, हिंसा, दहशतवाद, जातीभेद, वर्णभेद, पर्यावरणसंकट, असमानता या संकटांनी ग्रासलेले आहे. अशा वेळी बुद्ध धम्माचे संदेश अधिकच उपयुक्त ठरतात. अहिंसा आणि करुणा या मूल्यांमुळे शस्त्रांनी नव्हे तर संवादाने समस्या सोडवता येतात. समता आणि न्याय या तत्त्वांमुळे जातीभेद, वर्णभेद, लिंगभेद मिटवता येतात. मध्यमार्गामुळे अतिशय उपभोग किंवा अतिशय तपस्या टाळून संतुलित जीवन जगता येते.
ध्यान आणि विपश्यना या पद्धतींमुळे मानसिक शांती मिळते, जी आजच्या वेगवान आणि तणावग्रस्त जीवनासाठी अनमोल आहे. बुद्ध धम्म हा कोणत्याही एका धर्माचा ठेवा नसून संपूर्ण मानवजातीचा आहे. तो विवेक, करुणा आणि शांतीकडे नेणारा महामार्ग आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी या तत्त्वांचा स्वीकार करून समाजात समता, बंधुता आणि स्वातंत्र्य दृढ करण्याची शपथ घ्यायला हवी. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले शब्द आजही तितकेच खरे आहेत की, “बुद्धाचे धम्मचक्र कधीही थांबणार नाही; ते सतत फिरत राहील, कारण मानवमुक्तीची आस सदैव जिवंत आहे.”