नाशिक : नाशिक तालुक्यातील शिंगवे बहुला येथे स्मशानभूमी असूनही मृतदेहांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मरणातूनंतरही अवहेलना सहन करावी लागत आहे. येथील कॅन्टोन्मेंट बोर्ड वॉर्ड क्रमांक ७ मधील स्मशानभूमीच्या शेडला गेल्या २५ वर्षांपासून पत्रे नसल्याने, उघड्यावरच अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ नागरिकांवर आली आहे. भरपावसात अंत्यसंस्कारासाठी चक्क छत्रीचा आधार घ्यावा लागत असल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे.
शिंगवे बहुला येथील स्मशानभूमी केवळ एक सांगाडा बनली आहे. छताला पत्रे नसल्यामुळे पाऊस, ऊन आणि वाऱ्यापासून कोणतेही संरक्षण नाही. नुकतेच, अल्प आजाराने निधन झालेल्या तुकाराम गोपाळा पाळदे या ज्येष्ठ नागरिकांच्या अंत्यसंस्कारावेळी ही भीषण परिस्थिती पुन्हा अनुभवयास मिळाली.
पावसात भिजल्या चितेसाठीच्या लाकडा…
सकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अंत्यविधीसाठी रचलेली लाकडं पूर्णपणे ओली झाली. पाऊस थांबेल याची वाट पाहण्यात बराच वेळ गेला, पण पाऊस काही थांबला नाही. अखेरीस, अंत्यसंस्कार करायचा कसा, असा मोठा प्रश्न कुटुंबीयांसमोर उभा राहिला. अंत्यसंस्कारासाठी उपस्थित असलेल्या नागरिकांनाही छत्रीचा आधार घेऊनच उभे राहावे लागले.
एका बाजूला आधुनिक सुविधांची चर्चा सुरू असताना, दुसरीकडे स्मशानभूमीसारख्या मूलभूत ठिकाणीही पत्र्यांसाठी २५ वर्षांची प्रतीक्षा करावी लागणे, हे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करते.