मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप आणि त्याचे मित्रपक्ष सोडून इतर कोणत्याही पक्षांसोबत युती करण्यास आम्ही तयार असल्याचे मी २१ मे रोजी स्पष्ट केले होते, तसेच माझी पत्नी अंजली आंबेडकर यांनीही १८ जून रोजी त्याच भूमिकेची पुनरावृत्ती केली होती, असे ॲड. प्रकाश आंबेडकरांनी सांगितले.
मात्र, आजतागायत काँग्रेस किंवा इतर कोणत्याही पक्षाने वंचित बहुजन आघाडीसोबत युतीसाठी कोणताही संपर्क साधलेला नाही, याबद्दल त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, “भाजपने काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीसोबत युती करू नये, असा दबाव आणला आहे का? भाजपकडे काँग्रेसविषयी असे काय आहे, ज्यामुळे काँग्रेस भाजपला घाबरत आहे?”
त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात नवे चर्चासत्र रंगले असून, काँग्रेस आगामी निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडीसोबत युतीसाठी हात पुढे करणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.