औरंगाबाद : मुलींना शैक्षणिक शुल्कमाफी लागू असूनही काही महाविद्यालयांकडून अन्यायकारक पद्धतीने शुल्क वसुली केली जात असल्याच्या तक्रारीनंतर सम्यक विद्यार्थी आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे.
आंदोलनाच्या मागणीची तत्काळ दखल घेत उच्च शिक्षण सहसंचालकांनी सर्व महाविद्यालयांना ‘कुठल्याच मुलींकडून फीस घेऊ नका’ असे तात्काळ परिपत्रक काढून आदेश दिले आहेत.
या संदर्भात सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अक्रम खान यांच्या नेतृत्वाखाली उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. पंकजा वाघमारे यांची भेट घेण्यात आली होती. या भेटीत सविस्तर चर्चा करून आंदोलनाच्या वतीने शुल्क वसुली रोखण्याबाबत निवेदन देण्यात आले होते.
डॉ. पंकजा वाघमारे यांनी या मागणीची तात्काळ दखल घेतली आणि शुल्क माफीच्या नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. यामुळे आता औरंगाबाद विभागातील कोणत्याही महाविद्यालयाला विद्यार्थिनींकडून शुल्क घेणे शक्य होणार नाही.
सम्यक विद्यार्थी आंदोलनाने आवाहन केले आहे की, यापुढे कोणत्याही महाविद्यालयाने विद्यार्थिनींकडून शुल्क वसूल केल्यास, संबंधित विद्यार्थिनींनी तात्काळ सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.