सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेती, जनावरं, घरे, खत, बियाणे, शेतीमाल तसेच मशागतीची साधने वाहून गेल्याने ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली आहे. शेतकरी बांधवांना कोट्यवधींचे नुकसान सहन करावे लागत असून, शेतकऱ्यांचा संसार पुन्हा सुरळीत होण्यासाठी किमान एका वर्षाचा कालावधी लागेल, अशी भीषण परिस्थिती आहे.
सरकारने जाहीर केलेली प्रति एकर ३४०० रुपयांची मदत ही तुटपुंजी असून शेतकऱ्यांची थट्टा करणारी आहे, असा आरोप करत आज वंचित बहुजन आघाडी, सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.
या निवेदनात खालील मागण्या करण्यात आल्या –
- सोलापूर जिल्हा ओला दुष्काळग्रस्त घोषित करावा.
- शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर ५० हजार रुपयांची मदत द्यावी.
- पीकविमा रक्कम तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी.
- शेतकऱ्यांच्या नुकसानीचे जलद गतीने पंचनामे करावेत.
- शेतकऱ्यांचे सर्व कर्ज माफ करावे.
- बँकांकडून हप्त्यांचा तगादा त्वरित थांबवावा.
- रोगराई वाढू नये म्हणून आरोग्य यंत्रणा सतर्क ठेवावी व औषधांचा तुटवडा होऊ देऊ नये.
- फार्मर आयडीची अट रद्द करून सरसकट पंचनामे करावेत.
निवेदनानंतर बोलताना पदाधिकाऱ्यांनी इशारा दिला की, मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास वंचित बहुजन आघाडी आक्रमक आंदोलनाचा मार्ग अवलंबेल.
या निवेदन प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे, शहराध्यक्ष प्रशांत गोणेवार, जिल्हा महासचिव विनोद इंगळे, शहर उपाध्यक्ष गौतम थापटे, महिला शहराध्यक्ष सुरवशे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे रवी पोटे, अक्कलकोट शहराध्यक्ष विशाल ठोंबरे, यशवंत शेठ इंगळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.