उस्मानाबाद : भूम-परंडा तालुक्यातील पूरग्रस्त भागांना आज वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा नेते प्रविण रणबागुल यांनी भेट देऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या प्रचंड नुकसानीची पाहणी केली. या दौऱ्यात त्यांनी शेतकरी व नागरिकांच्या व्यथा जाणून घेतल्या तसेच संकटाच्या काळात त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.
यावेळी त्यांनी सांगितले की, “पूरामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतीची माती वाहून गेल्याने भरून न येणारे नुकसान झाले असून शासन स्तरावरून योग्य त्या उपाययोजना व मदत मिळावी, यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार आहे. या कठीण काळात आम्ही शेतकऱ्यांसोबत खंबीरपणे उभे आहोत.”
सामाजिक दायित्व म्हणून प्रविण रणबागुल यांच्यावतीने पूरग्रस्त बाधितांना रोख रक्कम स्वरूपात मदतही देण्यात आली.
शासनाला संवेदनशीलतेचे भान ठेवण्याचे आवाहन करत त्यांनी पुढे म्हटले की, “या भागात आलेल्या आपत्तीला ‘सरसकट ओला दुष्काळ’ जाहीर करून केंद्र व राज्य सरकारने तातडीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी.”