मराठवाडा : गेल्या काही दिवसांपासून पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. धाराशिव, बीड, जालना, आणि संभाजीनगरसह अनेक जिल्ह्यांमध्ये ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले असून, त्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
सलग सुरू असलेल्या या पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आला आहे. अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने घरांचे आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे. मागील २४ तासांत मराठवाड्यात पावसाने ८ जणांचा बळी घेतला आहे, तर शेकडो जनावरे दगावली आहेत. सर्वाधिक नुकसान बीड जिल्ह्यात झाले असून, तिथे ५७ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्या खालोखाल धाराशिव आणि परभणीमध्ये अनुक्रमे २१ आणि २२ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. एकूण १२९ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
सध्याच्या गंभीर परिस्थितीमुळे बीड, धाराशिव आणि परभणीमध्ये बचाव कार्यासाठी लष्कराला (आर्मी) पाचारण करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमधून लष्कराच्या तुकड्या मदत कार्यासाठी रवाना झाल्या आहेत. गोदावरी नदीच्या वाढत्या पातळीमुळे संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाने पुढील चार दिवस राज्यात अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. विशेषतः पुढील दोन दिवस मराठवाड्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, धाराशिवमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
या संकटामुळे मराठवाड्यातील शेतकरी आणि नागरिक हवालदिल झाले असून, त्यांच्यासमोर ‘जगायचं कसं?’ असा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे.
Amravati : परीक्षा फी वाढीचा निर्णय तत्काळ मागे घ्या – वंचित बहुजन युवा आघाडीची मागणी
अकोला : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने विविध शाखांच्या अभ्यासक्रमासाठी परीक्षा फी वाढविण्याचा घेतलेला निर्णय मागे घेण्याची मागणी वंचित बहुजन...
Read moreDetails