पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आरक्षणाला आव्हान दिल्याचे आरोप सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनले आहेत. या आरोपांमुळे महाविकास आघाडीमध्ये (MVA) आणि विशेषतः काँग्रेस व राष्ट्रीय जनता दल (RJD) या पक्षांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सुप्रिया सुळे यांनी NDTV ला दिलेल्या मुलाखतीत आरक्षण हे आर्थिक निकषावर असावं, अशी मागणी केली आहे. तसेच तिथे उपस्थित असलेल्या तरुणांना प्रश्न विचारून त्यांच्या मागणीला पाठिंबा असल्याचे सांगितले. त्यांच्या या कृतीवरून वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेत, त्यांना थेट सवाल केला आहे.
ट्विट करत वंचित बहुजन आघाडीने त्यांना प्रश्न विचारले आहेत.
सुप्रिया सुळे यांनी डॉ. आंबेडकरांनी संविधानिक मार्गाने दिलेल्या अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), आणि इतर मागासवर्गीय (OBC) आरक्षणाला आव्हान दिले आहे. शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरदेखील हे आरक्षण संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या संदर्भात, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांना थेट प्रश्न विचारण्यात आले आहेत. “तुमच्या राजकीय आघाडीचे सहयोगी बाबासाहेबांच्या आरक्षणाला आव्हान देत आहेत आणि जातीय आरक्षण संपवू इच्छित आहेत! तुम्ही दोघे सहमत आहात का?” असा सवाल या पोस्टमध्ये विचारण्यात आला आहे.
या आरोपांमुळे बिहारच्या राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे, कारण, तेजस्वी यादव यांचा पक्ष बिहारमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर नेहमीच आग्रही राहिला आहे.
निवडणुकीत संविधान आणि आरक्षणावर मत मागणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी, पक्षांनी याविषयी चुप्पी साधल्याचे दिसून येत आहे.