नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H1B व्हिसा शुल्कात वाढ करण्याच्या निर्णयावर स्वाक्षरी केल्याच्या वृत्तावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. ट्रम्प यांच्या या भूमिकेमुळे भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवर सर्वाधिक परिणाम होईल, असे सांगत आंबेडकर यांनी मोदींवर ‘ट्रम्प समर्थक’ असल्याचा आरोप केला आहे.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत म्हटले आहे की, ट्रम्प प्रशासन भारताविरुद्ध ‘मूक युद्ध’ (Silent War) लढत आहे. त्यांनी यासंदर्भात तीन प्रमुख घटनांचा उल्लेख केला.
अमेरिकेचे तीन निर्णय, भारतासाठी आव्हान?
१) पाकिस्तानला महत्त्व : अमेरिकेने भारताला बाजूला सारून पाकिस्तानला जवळ केले आहे. व्हाइट हाऊसमध्ये पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांना भोजनासाठी आमंत्रित करणे हे त्याचेच द्योतक आहे.
२) व्यापार शुल्क वाढ : अमेरिकेने परस्पर व्यापार शुल्कात ५०% वाढ केल्यामुळे भारताला आर्थिक फटका बसला आहे.
३) H1B व्हिसा शुल्क : सर्वात गंभीर बाब म्हणजे, ट्रम्प यांनी H1B व्हिसा अर्जांसाठी $1,00,000 (एक लाख अमेरिकन डॉलर) शुल्क आकारण्याच्या घोषणेवर स्वाक्षरी केली आहे. या निर्णयामुळे अमेरिकेतील भारतीय कुशल कामगारांना मोठा अडथळा निर्माण होईल.
ट्रम्प प्रशासनाने या निर्णयाबद्दल म्हटले आहे की, देशात येणारे लोक ‘खरोखर खूप कुशल’ आहेत आणि त्यांनी अमेरिकन कामगारांची जागा घेऊ नये, यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. यावर प्रतिक्रिया देताना ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, हे सर्व भारताला लक्ष्य करण्यासाठी केले जात आहे. ट्रम्प यांच्या या ‘मूक युद्धा’बद्दल पंतप्रधान मोदी ‘समर्थक’ असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.