परभणी : परभणी शहरातील राष्ट्रीय महामार्ग जिंतूर रोडवरील अनेक ठिकाणी गतिरोधक नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः जुना जिल्हा परिषद कॉर्नर, आयटीआय कॉर्नर, महात्मा फुले शाळा कॉर्नर, जाम नाका, जिंतूर नाका, गणपती चौक व वित्तावा कॉर्नर येथे वाहतूक मोठ्या प्रमाणावर असून शालेय विद्यार्थी तसेच नागरिकांची सतत ये-जा असते.
नुकत्याच रस्त्याच्या नूतनीकरणानंतर पूर्वीचे गतिरोधक समतल झाल्याने ते अदृश्य झाले आहेत. त्यामुळे वाहनधारकांकडून अतिगतीने वाहन चालविण्याच्या घटना वाढल्या असून अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने या सर्व ठिकाणी तात्काळ नवीन गतिरोधक बसविण्याची मागणी वंचित बहुजन आघाडी, तालुका परभणी तर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
तसेच परभणी लोकसभा मतदारसंघाचे खासदार बंडू उर्फ संजय जाधव यांना देखील हे निवेदन देण्यात आले. लवकरच हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासन खासदार जाधव यांनी दिले.
या निवेदनावर वंचित बहुजन आघाडी युवक आघाडी जिल्हाध्यक्ष (उत्तर) गणेश गाढे, तालुकाध्यक्ष (उत्तर) प्रमोद अशोकराव अंभोरे, युवक जिल्हा सचिव (उत्तर) प्रा. बालासाहेब गाढे, तालुका उपाध्यक्ष (उत्तर) शेख कलीम, वंचित कार्यकर्ते युनूस कच्ची, रुग्णहक्क संरक्षण समिती परभणी जिल्हाध्यक्ष व जेष्ठ पत्रकार दिलीप बनकर, राहुल तुपसमिंद्रे, अमोल पौळ आदींची उपस्थिती होती. सदर ठिकाणी तातडीने गतिरोधक बसविण्याची मागणी पूर्ण न झाल्यास जनहितार्थ आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.