पुणे : बार्टी, सारथी, महाज्योती, आर्टी आणि अमृत या शासकीय संस्थांनी मागील तीन वर्षांपासून संशोधक फेलोशिपची जाहिरात न काढल्याने विद्यार्थ्यांमध्ये असंतोष वाढला आहे. या गंभीर प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुण्यात जोरदार आंदोलन सुरू केले आहे.
या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला आहे. आज दुपारी १२ वाजता वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांची विचारपूस केली आणि त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत सरकारला या प्रकरणात तातडीने लक्ष घालण्याचा इशारा दिला.
याप्रसंगी, ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय सुविधांची व्यवस्था केली. तसेच, लवकरच ते विद्यार्थी शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करतील, असेही त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला आणि तातडीने फेलोशिपची जाहिरात काढण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांच्या या एल्गाराला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा मिळाल्याने या आंदोलनाची तीव्रता आणखी वाढली आहे. जोपर्यंत त्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून पुण्यातील गुडलक चौकात हे विद्यार्थी आंदोलन करत आहेत. या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, फेलोशिपची जाहिरात न आल्याने अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्याच्या संधीपासून वंचित राहावे लागत आहे आणि त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.