नांदेड : नांदेड जिल्ह्यातील पुरग्रस्तांना तातडीने मदत मिळावी, तसेच शेतकरी व नागरिकांच्या नुकसानीची योग्य ती भरपाई करण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष फारुक अहमद यांनी नांदेड येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठिंबा दिला.
यावेळी खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या :
१. 2024 च्या पुरग्रस्तांची मदत तात्काळ द्या – नांदेडमधील 2024 च्या पुरग्रस्तांचे पैसे तात्काळ खात्यात जमा करावेत. तसेच 2025 च्या अतिवृष्टीग्रस्तांचे सर्वेक्षण घर निहाय न करता कुटुंब निहाय किंवा घरकुलं निहाय करण्यात यावे. प्रत्येक कुटुंबाला किमान ₹५०,००० नुकसानभरपाई द्यावी.
२. नांदेड जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा – सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झाल्याने शेती करण्यायोग्य जमीन राहिलेली नाही. त्यामुळे कोल्हापूरच्या धर्तीवर नांदेड जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून विशेष पॅकेज द्यावे. शेतकऱ्यांना प्रति एकर एक लाख रुपये मदत तातडीने देण्यात यावी. त्यानंतर पीक व इतर नुकसानीची रितसर नुकसानभरपाई करावी.
३. गाव-तांड्यांचे पुनर्वसन आणि पशुधनाची नुकसानभरपाई – ग्रामीण भागातील पुरग्रस्त गाव-तांड्यातील प्रत्येक कुटुंबाला ₹५०,००० तात्काळ मदत करावी. तसेच अशा गावांचे पुनर्वसन करावे. पशुपालक व दुग्धव्यवसायिकांच्या जनावरांचे झालेले नुकसान बाजारभावानुसार संपूर्ण रक्कम देण्यात यावी.
यावेळी फारुक अहमद यांनी स्पष्ट केले की, “जोपर्यंत पुरग्रस्तांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरू राहील.”