मुंबई : मालाड पश्चिम येथील वळणाई परिसरात ७ जुलै रोजी एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून पडून २४ वर्षीय अभियंत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ओमकार संख्ये असे मृताचे नाव असून, त्यांच्या वडिलांनी विकासकाच्या निष्काळजीपणामुळे मुलाचा जीव गेल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ओमकार संख्ये हा श्रीजी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या विकासकासोबत श्री वैतीविनायक मंगलम एसआरए सोसायटीमध्ये कनिष्ठ साइट इंजिनिअर म्हणून कार्यरत होता. ७ जुलै रोजी ओमकार इमारतीच्या दहाव्या मजल्यावर कामाची पाहणी करत असताना, तो सहाव्या मजल्याच्या स्लॅबवर कोसळला. या घटनेत ओमकारच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
ओमकारचे वडील विनोद संख्ये (६४) यांनी मालाड पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, विकासकाने कामगार आणि साइट अभियंत्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेली सुरक्षा जाळी, सेफ्टी बेल्ट, हेल्मेट किंवा इतर कोणतीही सुरक्षा साधने पुरवली नव्हती. तसेच, ज्या ठिकाणी ओमकार काम करत होता, तिथे लोखंडी वॉकवे जाळी स्लॅबवर योग्यरित्या न बसवता कोणत्याही आधाराशिवाय एका बाजूने ठेवण्यात आली होती, ज्यामुळे हा अपघात घडला. विकासकाच्या या निष्काळजीपणामुळेच आपल्या मुलाचा जीव गेल्याचे विनोद संख्ये यांनी म्हटले आहे. याप्रकरणी मालाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.