बोगोटा : कोलंबियामध्ये एका छोट्या प्रवासी विमानाला लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला असून, या दुर्घटनेत विमानातील सर्व १५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा अपघात विमान लँडिंग करत असताना व्हेनेझुएलाच्या सीमेजवळ झाला.
नागरी विमान वाहतूक प्राधिकरण आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या मते, हे विमान सरकारी विमान कंपनी सतेनाद्वारे चालवले जाणारे आणि एका खासगी कंपनीकडून भाड्याने घेतलेले ट्विन-प्रोपेलर बीचक्राफ्ट 1900 होते.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान काल दुपारी कोलंबियाच्या सीमावर्ती कुकुटा शहरातून उड्डाणासाठी निघाले होते. अवघ्या 23 मिनिटांच्या प्रवासानंतर ते ओकाना येथे उतरणार होते. मात्र, उड्डाणानंतर काही वेळातच हवाई वाहतूक नियंत्रणाशी विमानाचा संपर्क तुटला. विमानात 13 प्रवासी आणि दोन क्रू मेंबर्स होते.
विमान वाहतूक प्राधिकरणाच्या एका अधिकाऱ्याने एएफपी या वृत्तसंस्थेला सांगितलं की, ‘या अपघातात विमानातील कोणीही जिवंत राहिलेलं नाही.’ मात्र, हा अपघात नेमका कशामुळे झाला? याचं कारण तात्काळ स्पष्ट होऊ शकलेलं नाही.
अपघातग्रस्त विमानाचे अवशेष अँडीज पर्वतरांगांच्या पूर्वेकडील भागात सापडले आहेत. आजूबाजूचा मोठा ग्रामीण भाग कोलंबियाच्या सर्वात मोठ्या गनिमी संघटनेपैकी एक असलेल्या नॅशनल लिबरेशन आर्मीच्या प्रभावाखाली असल्याचेही सांगण्यात येत आहे.
विधानसभा उमेदवाराचा मृत्यू
आतापर्यंत सात मृतदेह सापडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. उत्तर सँटेंडर राज्याचे गव्हर्नर विल्यम विलामिझर यांनी स्थानिक वृत्तपत्र सेमानाशी बोलताना सांगितलं की, या विमानात एक कोलंबियन खासदार आणि विधानसभेचा एक उमेदवार प्रवास करत होते.
या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये कोलंबियाच्या चेंबर ऑफ डेप्युटीजचे 36 वर्षीय सदस्य डायोजेनेस क्विंटेरो आणि आगामी निवडणुकीतील उमेदवार कार्लोस साल्सेडो यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.





