Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home विशेष चळवळीचा दस्तऐवज

२२ वर्षां पूर्वीची बाळासाहेब यांची मुलाखत

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
April 10, 2021
in चळवळीचा दस्तऐवज
0
२२ वर्षां पूर्वीची बाळासाहेब यांची मुलाखत
       

१४ एप्रिल, १९९९ च्या ‘प्रबुध्द भारत’ च्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेषांकात आमचे तत्कालीन औरंगाबाद व आताचे ‘गोवा’ येथील फुले-आंबेडकरी विचारांचे पत्रकार सहकारी प्रभाकर ढगे यांनी बाळासाहेब आंबेडकर यांची २२ वर्षांपूर्वी मुलाखत घेतली होती. १९९५ ची “बहुजन श्रमिक समिती” च्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व २८८ विधानसभा जागा व स्वत: भारिप बहुजन महासंघाने पहिल्याच निवडणुकीत सर्वाधिक जागा लढविल्या होत्या. या निवडणुकीत प्रथमच महाराष्ट्रात प्रदीर्घ काळ सत्तेवर असलेल्या व मूठभर  श्रीमंत मराठा घराणेशाहीच्या कॉंग्रेसचा पराभव झाला होता. आणि राज्यात फारच थोड्या मतांनी शिवसेना-भाजप सत्तेवर आली होती. यामुळे सर्व पुरोगामी पक्षांतील ’उच्चवर्णीय, शहरी, मध्यमवर्गीय, कॉग्रेसकेंद्री नेतृत्व” अस्वस्थ झाले होते. महाराष्ट्रात प्रथमच फुले-आंबेडकरांच्या लढाऊ शक्तीसोबत बहुसंख्य परिवर्तनवादी पक्ष-संघटनांनी ऐतिहासिक आघाडी केल्यामुळे कॉंग्रेस-भाजप-शिवसेना यांना समर्थ सामाजिक-राजकीय पर्याय उभा राहण्याची शक्यता निर्माण झाली होती. समितीने एकत्र बसून ठोस धोरण, कार्यक्रम ठरवून बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली एका बाजूला वंचित बहुजन
समूहांच्या कळीच्या प्रश्नांवर चळवळ करायची आणि दुस-या बाजूला मिळालेल्या मतांच्या आधारावर आपापले  लोकसभा-विधानसभा मतदारसंघ निश्चित करून पुढील निवडणुकीची तयारी करायची अशी सार्थ राजकीय अपेक्षा होती.

महात्मा गांधी यांचा खून आणि प. महाराष्ट्रातील ब्राह्मणांची कत्तल, त्यातून सर्वत्र गावांगावातील ब्राह्मणांनी मुंबई-पुणे-औरंगाबाद-नांदेड, आदी शहरांकडे पलायन केले होते. आधीच शिक्षणाची परंपरा व ब्रिटीशांसोबतचा प्रशासनातील अनुभव असल्याने तेव्हापासून सर्व ब्राह्मण एकतर साहित्य-संस्कृती, नाट्य-सिनेमा, प्रशासनात स्थिरावले होते. त्यांना भारतीय स्वातंत्र्यानंतर पंडीत नेहरूंपासून राज्यातील कॉंग्रेसी मराठा नेतृत्वाने संपूर्ण संरक्षण दिले. “त्या मोबदल्यात सफाई कामगार सोडल्यास अन्यत्र कोणत्याही प्रशासनामध्ये अनु.जाती-जमाती-ओबिसी
समूहांसाठीच्या आरक्षणाची फारशी अंमलबजावणी करायची नाही. वंचित बहुजनांचा हक्क डावलून तेथे पुरोगाम्यांसह रा.स्व.संघाच्या विद्वेषी ब्राह्मणांची सरसकट भरती केली गेली. याचा परस्पर नातेसंबंध कुणीही सांगेल, “

काही काळ कॉंग्रेसी मराठा नेतृत्वाला शरण गेल्याचे नाटक करून आपापली स्थानं बळकट केली गेली. आणि जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा या संघीय ब्राह्मणांनी मध्यम जातींमधील कष्टकरी, अर्ध शिक्षित तरुणांना संघ शाखा व विविध छुप्या आघाड्यांमार्फत सोबत घेवून त्यांनी  भाजपला सत्तेवर बसविले. दुसरीकडे पुरोगामी ब्राह्मण समूह, पत्रकार- आणि कॉंग्रेसने बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली जर सर्व साम्यवादी-समाजवादी-संघटना-चळवळी आणि भारिप बहुजन महासंघ यांची राजकीय आघाडी स्थिरावली तर “आपले काही खरे नाही” हे प्रस्थापित नेतृत्वाने जाणले होते.म्हणून एका बाजूला विविध माध्यमांतून बाळासाहेब व त्यांच्या सामाजिक-राजकारणाविरुध्द पत्रकारांनी धादांत खोटा प्रचार सुरू केला. बहुसंख्य पुरोगामी, अभ्यासक (?), विचारवंतांनी निवडणूक आयोगाच्या कोणत्याही आकडेवारीचा आधार न घेता “कॉंग्रेसची मते + भारिप बहुजन महासंघाची मते” अशा “मराठा-कॉंग्रेसकेंद्री समीकरणातून” सोयीचे, पूर्वग्रह दूषित राजकीय अंकगणित मांडत राहिले. लिखाण करत राहिले. त्यापेक्षा अधिक महत्त्वाचं म्हणजे विषारी मौखिक पध्दतीने राजकीय चारित्र्य हनन करीत राहिले. आणि आताही करत आहेत.

भारिप बहुजन महासंघाचे अधिकृत आकडेवारीसह आलेले लिखाण, भूमिका वा त्यांच्या अभ्यासक-विचारवंतांच्या लिखाणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले. यामागे आणखी एक सुप्त न बोललेले कारण म्हणजे “पारंपरिक ’ब्राह्मणी-हिंदू धर्मा’ला” लाथाडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर, १९५६ ला आपल्या लाखो अनुयायांसह ब्राह्मणी हिंदू धर्म त्यागून बौध्द धम्म स्वीकारला” हे “तथाकथित  बुध्दिवादी, विवेकवादी, विज्ञानवादी, धर्मनिरपेक्ष” पुरोगामी वर्तुळाला अजिबात पटलेले नाही. गायरान-पडीत-वन जमीन हक्क चळवळीपासून १९९५ च्या समितीच्या निवडणुकीपर्यंत भारिप बहुजन महासंघाच्या नेत्यापासून माझ्यासारख्या तत्कालीन पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांना काय काय सहन करावे लागले याचे आम्ही सारे साक्षीदार आहोत! यात भार पडली “रिपब्लिकन-दलित ऐक्य” च्या राजकीय कट कारस्थानाने! या पार्श्वभूमीबर तत्कालीन “भारिप बहुजन महासंघा” चे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी विचारपूर्वक पण ऐक्याच्या “कॉग्रेसी राजकीय डावा” बाबतीत अत्यंत रोखठोक सविस्तर उत्तर १४ एप्रिल, १९९९ च्या “प्रबुध्द भारत” डॉ. बाबासाहेब आंबेडकरजयंती विशेषांक” मध्ये खालील मुलाखतीत दिले आहे. एवढेच नाही, तर बाळासाहेब “सम्यक समाज ते भारिप ते भारिप बहुजन महासंघ ते वंचित बहुजन आघाडी” असा “वंचित बहुजन सत्तेच्या” वाटचालीकडे धिमा पण यशस्वीपणे वाटचाल करत आहेत. त्यामागील सविस्तर वैचारिक व धोरणात्मक मांडणी केली आहे. ही वाटचाल डॉ. बाबासाहेबआंबेडकर यांच्या “बहिष्कृत हितकारिणी ते स्वतंत्र मजूर पक्ष ते शेड्युल्ड कास्ट फेडरेशन ते रिपब्लिकन पक्ष संकल्पनेचे भारतीय जनतेला खुले पत्र” लिहीपर्यंतची वाटचाल हे सारे त्यांच्या सामाजिक-राजकीय चळवळीतील प्रक्रियेतील टप्पे आहेत. ते अचानक मध्येच खंडित करुन आता फुले-आंबेडकरी इतिहास, विचार व चळवळीकडे पाहता येणार नाही. या मुलाखतीत बाळासाहेब याविषयी विचार मांडताना दिसत आहेत……

आघाड्यांच्या लबाड्या फार झाल्या; आता पर्यायी ताकद उभी करू!
खासदार बाळासाहेब आंबेडकर

”सत्तेसाठी भाजपबरोबर घरोबा करून आपली पत हरवून बसलेले बसपा नेते कांशीराम, जातीवाद्यांच्या नावाने बोटे मोडण्यात; ज्यांची उभी हयात गेली ते तथाकथित समाजवादी जॉर्ज फर्नांडिस आणि दक्षिणेतील दलित एझीलमलाई हे जातिनिष्ठ भाजप आघाडीमध्ये कोडगेपणाने सत्ता उपभोगत असतानाच जनता दलाचा राजीनामा देवून कांशीरामाच्याच वाटेने जाण्याची तयारी करीत असलेले रामविलास पासवान, कॉंग्रेसची राखीव फौज म्हणून वावरणारी व बहुजनांचे राजकारण करीत असल्याचा आव आणणारी समाजवादी मंडळी अन या कोलाहलात ’जय बोलो और किधर भी चलो’ असा नारा लावून शिवसेना-भाजप युती सारख्या धर्मांध व जात्यंध पक्षांच्या कच्छपी लागलेले काही मागास वर्गीय नेते अन रिपब्लिकन पक्षात चाललेली साठमारी’ या पार्श्वभूमिवर दलित-ओबिसी एकजुटीचा फॉर्म्युला घेवून सामाजिक समतेच्या बांधिलकीचे व्यापक राजकारण करणारे एड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हे ’मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या सहवासात’ या ग्रंथाच्या प्रकाशन समारंभानिमित्त औरंगाबादेत आले असता त्यांच्याशी केलेली बातचित.
मुलाखत : प्रभाकर ढगे

 रिपब्लिकन पक्षाची फूट हा
दलित जनतेचा सर्वांत काळजीचा विषय. आठवले-गवई-कवाडे एका बाजूला ,तर टी.एम कांबळे दुस-या बाजुला तर आंबेडकर-ढाले तिस-या
 बाजूला, अशा स्थितीत आठवले व आपणही निवडणूक आयोगाकडे पक्षाच्या मान्यतेसाठी अर्ज केला आहे. आयोगाचा निर्णय विरोधात गेला ,तर आपण काय करणार आहात?

बाळासाहेब : लोकशाही पध्दतीने आम्ही लोकांच्या सहमतीने नियमानुसार पक्षाची कार्यकारिणी निवडली आहे व ती निवडणूक आयोगाकडे पाठवली आहे. आम्ही आमचं काम केलं आहे. निवडणूक आयोगाने त्याचे काम करावं. पक्षाच्या मान्यतेबाबत म्हणाल तर मी निवडणूक आयोगाला फारसे महत्त्व देत नाही. निवडणूक आयोग हे पोस्ट खातं आहे आणि निवडणूक आयुक्त हे पोस्टमास्तर आहेत. बस्स! यापलीकडे मी त्यांना फारसे गांभिर्याने घेत नाही. कारण तिथे बसलेले जे कुणी आहेत; ते तथाकथित ऊच्च वर्णी यांचे प्रतिनिधित्व करतात आणि दलित बहुजन जनतेच्या पक्षाकडे ते कधीही सहानुभूतीने पाहू शकणार नाहीत.

 महाराष्ट्रातील रिपब्लिकन नेते हे विकाऊ असल्याची व ते एकाच जातीगटाचे नेतृत्व करीत असल्याची टीका बसपा नेते कांशीराम करत असतात. त्याबद्दल आपणाला काय म्हणायचे आहे.

बाळासाहेब : ज्यांच्या राजकीय आयुष्याची उभी हयातच सत्तेसाठी तत्त्वशून्य आणि
 दलितद्रोही तडजोडी करण्यात स्वत:ला विकण्यात गेली; त्यांनी दुस-यांवर आरोप करून आपण फार धुतल्या तांदळासारखे आहोत ,असा आव आणू नये. राजकारणाला पैसा लागतो हे लपवता कशाला? ज्याच्याकडे लाखाची सुध्दा प्रॉपर्टी नव्हती; ते कोट्यधीश कसे झाले हे जनतेला कळत नाही काय? जातीगटाबाबत म्हणत असाल तर इतरांचे मला माहीत नाही; पण सुरुवातीपासून आम्ही मात्र दलित-ओबिसी राजकारण करत आलो आहोत. बहुजनांच्या राजकारणाची अपरिहार्यता व त्यादृष्टिने ठोस कार्यक्रम देण्याचं काम आम्ही फक्त केलं आहे. त्यामुळे आमच्याबाबतीत मात्र या टीकेत काही तथ्य नाही.

 जो रिपब्लिकन पक्ष कधीही होवू शकत नाही; त्यांच्याशी कॉंग्रेसने युती का करावी, असा प्रश्न आजकाल उपस्थित केला जातो.

बाळासाहेब : नका करू ना युती. आम्ही कुठे आग्रह धरलाय? आम्ही कुणाच्याही मागे धावणार नाहीत. ज्याला कुणाला सत्तेत जाण्याची इच्छा आहे; त्याने आमच्या मागे यावे. आम्ही कुणाला आमंत्रण देणार नाही. युती तोडण्याचा पुढाकार कॉंग्रेसने घेतला. आता देखील काय करायचे हे त्यांनीच ठरवावे. आम्ही आमच्या पध्दतीने चाललो आहोत. जे कॉंग्रेसमध्ये विलीन झाले; त्यांनीच तो विचार करायचा आहे. कारण कॉंग्रेसच्या कुबड्या घेतल्याशिवाय आपण उभे राहू शकणार नाही ही भीती त्यांनाच वाटते. रिपब्लिकन ऐक्याचा मुद्दाच आता निकाली निघाला आहे. कारण रिपब्लिकन पक्षाचे खरे शिलेदार कोण आहे हे जनतेला कळून चुकले आहे. त्यामुळे कुणाच्या मागे जायचे हे देखील त्यांनी नक्की केले आहे. एकीकृत रिपाईचे भांडवल करून जर कुणी आम्हाला मॅनेज करू पाहत असेल तर तो प्रयत्न
कधीही यशस्वी होणार नाही. रिपाई-बहुजन महासंघ हे नैसर्गिक ऐक्य त्या सर्व थोतांडांना पुरून उरणार आहे.

 तुम्ही जातीयवादी पक्षांशी लढण्याची भाषा करता आणि प्रत्यक्षात सेना-भाजप सारख्या पक्षांना सोयीची भूमिका घेता, असा आरोप गवई-आठवले व कॉंग्रेसकडून केला जातो.

बाळासाहेब : लग्न एकाशी करायचे आणि संसार दुसरीशी करायचा असा काहीसा प्रकार आहे तसल्या प्रकारचा वैचारिक भ्रष्टाचार मी करत नाही. माझ्यावर आरोप करणारांबाबत तर एक ताजे उदाहरण आहे. राज्यातील सत्तारुढ सेना-भाजप युतीच्या विरोधात अहोरात्र बोंबलणा-या कॉंग्रेसने पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप-सेनेशी युती का केली त्याचा खुलासा केला पाहिजे. आम्ही युतीला धार्जिणे निर्णय घेतो ,असे म्हणणा-या कॉंग्रेसने आधी आपले राजकीय चारित्र्य तपासून बघावे अन माझ्यावर आरोप करणारे व कॉंग्रेसच्या कच्छपी लागलेले गवई-आठवले यांनी देखील त्याचे उत्तर द्यावे. महापालिकेसारख्या निवडणुकीत ज्यांचे चारित्र्य गहाण पडते व निष्ठा गळून पडतात ती कॉंग्रेस आणि तिला पुरोगामी म्हणणारे आठवले-गवई त्याचे कुठल्या तोंडाने समर्थन करणार आहेत; हे आता तुम्हीच त्यांना विचारले पाहिजे.

 बहुजन राजकारणाला पेच ठराव्या अशा काही घटना घडताना दिसतात. उदा. मातंगांनी वेगळ्या ७% आरक्षणाची मागणी, चर्मकारांनी रविदासांना घेवून मांडलेली वेगळी चूल, शिवसेनेच्या मागे चाललेले कोळी व इतर बहुजन, भाजपाच्या नादी लागलेल्या काही अनुसूचित जाती-जमाती अशा वातावरणात सामाजिक सलोखा निर्माण होण्याऐवजी जातीय यादवी माजेल असे वाटत नाही कां?

बाळासाहेब : तिस-या आघाडीचे प्रयत्न कोण करतंय हे मला
माहीत नाही. कलमाडी हे तर भाजपचे दलाल आहेत. त्यामुळे त्यांचे व आमचे जुळणे शक्यच नाही. शिवाय ,ममता बॅनर्जी, रामकृष्ण हेगडे हे सगळे भाजपबरोबर सत्ता उपभोगत आहेत. ते काय तिसरी आघाडी करणार? मी तर आता तिस-या आघाडीची शक्यताच गृहीत धरत नाही. आता पर्यायी पक्ष, पर्यायी ताकद Alternative force उभा राहिला पाहिजे, हा माझा आग्रह आहे व तीच काळाची गरज आहे.  आघाड्याच्या लबाड्या खूप झाल्या. आता पर्याय देण्याची उमेद हवी आणि त्याची सुरुवात आम्हीच केली आहे. राजकीय, सामाजिक स्वयंसेवी अशा सर्वच स्तरातील छोट्या- मोठ्या संस्था, कार्यकर्ते, नेते यांनी आपापल्या ठिकाणी तालुका-जिल्हा पातळीवर काम सु रू केले आहे. वातावरण बदलण्यासाठी काम सुरू आहे. मला वाटते हे अगदी खालच्या स्तरावर सुरू असले तरी महत्त्वाचे आहे. पर्यायी ताकद तिथूनच उभी राहणार आहे आणि त्याच्यावर आमचे लक्ष आहे. त्यामुळे आम्ही सध्या फक्त पक्ष वाढवायचं काम करीत आहोत.

 कॉंग्रेसने युती केली नाही ,तर आगामी निवडणुका तुम्ही कुणाच्या सोबत व किती जागांवर लढवणार? तुमचा काही स्वतंत्र जाहीरनामा आहे का?

बाळासाहेब : युती झाली नाही तर २८८ जागांची तयारी आम्हाला करावी लागेल. त्यासाठी तर पक्ष बांधणी आणि वाढवण्याचं काम जोरात सुरू आहे. प्रतिसादही उत्तम मिळतोय. लोक विचारतात नांदेड अधिवेशनाचं फलीत काय?’ तर मी सांगत असतो की,”त्यात सहभागी न होणा-यांची डिपॉझिटे जप्त होताहेत हे त्याचे फलीत आहे. अकोला जिल्हा परिषदेत कॉंग्रेस आमच्या विरोधात असताना आम्ही निर्विवाद बहुमत मिळवलं आणि पुणे अधिवेशन घेतलं; ते मात्र कॉंग्रेससोबत असूनही पराभूत झाले हे आमच्या अधिवेशनाचे यश आहे.’
आमचा स्वतंत्र जाहीरनामा आहेच. सतत तीन वर्षे कोरड्या व ओल्या दुष्काळाने पिचलेल्या शेतक-यांना कर्जमाफी देणे, कर्ज वसुली थांबविणे, दुष्काळी जिल्हे जाहीर करणे, शेतक-यांची बाजाराभिमुख उत्पादकता वाढविणे, ओबिसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, कर्मचा-यांच्या सेवा निवृत्ती वयाचा घोळ थांबविणे, असे अनेक मुद्दे आहेत ते योग्य वेळी जाहीर होतील.
 राज्यातील सेना-भाजप युती, केंद्रातील भाजप आघाडी ही सरकारे किती दिवस चालतील असे आपणास वाटते?
बाळासाहेब : महाराष्ट्राचं दिवाळं काढणार्रं युती सरकार जनतेच्या, कर्मचा-यांच्या व सर्वच घटकांच्या मनातून उतरलेलं आहे. या सरकारला खाली खेचण्याची कॉंग्रेसची इच्छा नव्हती म्हणून ते सत्तेवर राहू शकलं. केंद्रातील भाजप आघाडी सरकारचंही तसच आहे. कॉग्रेसची इच्छा असेल तोपर्यंत हे सरकार चालेल. ज्या दिवशी कॉंग्रेसला पाडावे वाटेल त्या दिवशी ते पडेल. परंतु, कुठल्याही परिस्थितीत हे सरकार पाच वर्षांची टर्म पूर्ण करणार नाही एवढे मात्र निश्चित!  

शांताराम पंदेरे


       
Tags: olddocumentoldintreviewprakshambedkarshantarampandere
Previous Post

जाणिवा समृद्ध करणारी “पटेली”

Next Post

कुठे आहे सरकारचे आपत्ती व्यवस्थापन?

Next Post

कुठे आहे सरकारचे आपत्ती व्यवस्थापन?

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
रक्षाबंधनानिमित्त वंचित महिला आघाडीचा अनोखा उपक्रम; पोलिसांना राखी बांधून कर्तव्याची आठवण‎
बातमी

रक्षाबंधनानिमित्त वंचित महिला आघाडीचा अनोखा उपक्रम; पोलिसांना राखी बांधून कर्तव्याची आठवण‎

by mosami kewat
August 16, 2025
0

पुणे : उत्तम नगर पोलीस ठाण्यात वंचित बहुजन महिला आघाडी व वंचित बहुजन आघाडीच्या खडकवासला विधानसभा शाखेने अनोख्या पद्धतीने पोलिसांना...

Read moreDetails
independence day : दापोलीत ‘सम्यक विद्यार्थी आंदोलना’च्या वतीने डॉ. आंबेडकरांच्या योगदानावर व्याख्यान

independence day : दापोलीत ‘सम्यक विद्यार्थी आंदोलना’च्या वतीने डॉ. आंबेडकरांच्या योगदानावर व्याख्यान

August 16, 2025
लातूर येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

लातूर येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2025
अकोल्यात धनगर समाजातील युवकांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश!

अकोल्यात धनगर समाजातील युवकांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश!

August 15, 2025
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये ढगफुटीमुळे माचैल माता यात्रेदरम्यान 45 भाविकांचा मृत्यू, 70 हून अधिक बेपत्ता

जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये ढगफुटीमुळे माचैल माता यात्रेदरम्यान 45 भाविकांचा मृत्यू, 70 हून अधिक बेपत्ता

August 15, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home