Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home वारसा सावित्रीचा

सत्यशोधकी जाणीव – नेणीवामधून साकारलेल एक फोटो प्रदर्शन

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
April 12, 2021
in वारसा सावित्रीचा
0
सत्यशोधकी जाणीव – नेणीवामधून साकारलेल एक फोटो प्रदर्शन
       

आपल्याकडे फोटो हा सामन्य माणसांच्या आयुष्यातला दुर्मिळ क्षण होता हे आता कदाचित सांगूनही खरे वाटणार नाही. कारण आजमितीला लहान मुलांपासून ते जेष्ठांपर्यंत सर्वांकडे मोबाईल आहे, आणि हा मोबाईल फक्त संवाद साधण्यचे साधन राहिलेला नाही. त्यावर बरेच ‘उद्योग’ केले जातात. हे उद्योग दोन्ही प्रकाचे आहेत. काही उपयुक्त, संयुक्तिक, फायद्याचे आहेत तर काही अक्षरशः समाजविघातक. भारतासारख्या जातीची विषमता असणाऱ्या देशात फोटो काढण्याची सुविधा उपलब्ध झाली ती सुरवातीच्या काळात विशिष्ठांसाठीच ! सामन्यांसाठी ती मौजच होती. भीम शाहीर वामनदादा कर्डक यांनी स्त्रियांच्या आयुष्यात साजाणासोबत फोटो काढण्याचे काय महत्व असते, तिच्या काय भावना त्या फोटोशी जोडल्या गेलेल्या सतत या संबंधी एक गीत लिहिले होते- ‘ खाण, लेण, सोन, नाण नको जिलबी लाडू, चल सजणा फोटू काढू’

काळ बदलत गेला आणि फोटो काढणारे, फोटो काढून घेणारे यांची संखेत गुणात्मक वाढ होत गेली. जागतिकीकरणाच्या युगात फोटो काढण्याच्या व्यवसायाला एक वेगळेच महत्व प्राप्त झाले. फूड फोटोग्राफी, वाईल्ड फोटोग्राफी इ इ प्रकारचे फोटोग्राफर आपल्या आवडी व गरजांनुसार कामास लागले. काहींनी व्यवसाय तर काहींनी हा छंद म्हणून जोपासला. या सर्व बदलत्या परिस्थितीत फोटो काढणारी व्यक्ती कोण आहे? ती कोणाचे, कशाचे फोटो काढते? हे मुद्दे फार महत्वाचे ठरतात. कारण फोटो काढणे ही एक कला आहे. कला, साहित्य संकृतीचा इतिहास, फोटो काढणाऱ्यांच्या जाणीव-नेणीवा या त्या व्यक्तीच्या फोटोग्राफीवर प्रभाव आणि परिणाम करीत असतात. फोटो नेमका कशाचा काढायचा ? का काढायचा ? त्यात नेमके कोणते सौंदर्य आहे ? हेही त्या व्यक्तीच्या जाणीव-नेणीवा निर्धारित करीत असतात. भारतासारख्या जातीवर्गस्त्रीदास्यामूलक समाजात व्यक्तीच्या जाणीव-नेणीवांवर जातीवर्ग आणि लिंग प्रभाव गाजवताना दिसते.

माणसाच्या जाणीवा बदलू शकतात. माणसे जितकी नव्या प्रगत उत्पादन साधनाच्या आणि पद्धतीच्या सानिध्यात येतात, त्याच्याशी त्यांचा संबंध येतो तसतश्या व्यक्तीच्या जाणीवा बदलत जातात, त्यांचा विकास होत जातो हे सूत्र मार्क्सवादत सांगितले गेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा खेडी सोडा, शहराकडे चला हा विचारही या संदर्भात किती महत्वाचा होता हे लक्षात येते. आपल्याकडे उत्पादन साधनेच जातीच्या मालकीची होती. परिणामी उत्पादनसंबंधही जातीप्रधान राहिले. ब्रिटीश आगमनानंतर आलेल्या भांडवलशाहीच्या परिणामी त्यात काहीशा बदलाची प्रक्रिया सुरु झाली. परंतु तेंव्हा पासून अद्यापही व्यवस्था अंताची सामाजिक क्रांती न झाल्याने जाणीव प्रायः जाती वर्चस्वाच्या आणि त्यात सामावलेल्या वर्गीय अशा स्वरूपाच्या राहिलेल्या दिसतात. फोटो काढणारी व्यक्ती कोणत्या जातीवार्गातील आहे, ती स्त्री आहे की पुरुष यावर घेतला जाणारा फोटो, त्याचा दर्जा, त्याची वाहवा किंवा निर्भत्सना किंवा दुर्लक्ष अवलंबून असते. एकाद्या पुरुषाने क्यामेराने क्लिक केलेला निसर्ग आणि स्त्रीने क्लिक केलेला निसर्ग यात जमीन अस्मानाचे अंतर असू शकते. आणि त्याचे स्वागत किंवा त्या कडील दुर्लक्षही!

आपल्या क्यामेराला आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग मानून केली जाणारी फोटोग्राफी निराळाच असते! एखादा कलाकार जेंव्हा फोटो काढत असतो ती केवळ एक क्लिक नसते. त्या व्यक्तीचा विचार, जीवनाकडे, समाजाकडे, जगण्याकडे बघण्याचा दृष्टीकोन त्यातून अभिव्यक्त होत असतो. काही कलाकार एखादी थीम / विषय घेऊन काम करतात. ‘स्त्रिया’ या थीम वर काम करणाऱ्या फोटोग्राफर्सचे फोटो एकत्रित पहिले तर ‘स्त्री’ म्हणू आजवर त्याच्या घडवलेल्या गेलेल्या प्रतिमा त्यातून व्यक्त होताना दिसतील. मग कोणी शृंगार करणाऱ्या स्त्रिया, कष्ट करणाऱ्या, असाध्य कार्य केलेल्या स्त्रिया, भारतातील वेगवेगळ्या प्रांताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या स्त्रिया चितारू शकतात. हि कलाकारी करताना त्यांच्या जाणीवा त्यातून वक्त होतात. पण काही कलाकार वेगळ्याच धाटणीचे असतात. ते कष्ट करणाऱ्या स्त्रिया चितारताना, त्यांचे फोटो काढताना डोंबारी स्त्रिया, भाकरी थापणाऱ्या स्त्रिया, शेतात लावणी करणाऱ्या स्त्रियांचे फोटो क्लिक करतील. थीम – विषय सारखाच पण फोटो वेगळे, नुसते वेगळे नाही तर गुणात्मकदृष्ट्या वेगळे काढले गेले. याचे कारण फोटोग्राफरची विचारदृष्टी! बुगुबुगु वाजवत भिक्षा मागणे ज्यांना जातीव्यवस्थेने भाग पडले आहे, अशा जातीतील स्त्रिया कष्टच तर करतात ना? हा विचार त्या मागे कार्यरत असतो. वाद्य वाजवणे, शेतीकाम करणे, घरकाम करणे हे उत्पादक श्रमच असतात हा ‘सत्यशोधक स्त्रीवाद’ त्यांनी फोटो मधून व्यक्त केलेला असतो. अशा फोटोग्राफीत जातीवार्गाच्या आणि स्त्रीवादाच्या जाणीव आणि नेणीवाच तर असतात असे आपण हमखास म्हणू शकतो.

अर्थात या सर्व मांडणीचा अर्थ या जाणीवा जन्मजातच असतात, त्यात बदलतच येऊ शकत नाहीत असे अजिबातच नाही. आधी उल्लेख केल्या प्रमाणे त्या विकसित हो जातात. जात जाणीव या जन्माने मिळणाऱ्या जातीतून मुख्यतः घडविल्या जातात हे जरी खरे असले तरी जातीचा अहंगंड किंवा न्यूनगंड वजा करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत त्यावर मात करता येते, केली पाहिजे. जातीव्यवस्थेने उच्चजातीयांत अहंगंड तर कनिष्ठ जातींना न्यूनगंड दिला आहे. ‘डीकाष्ट’ होण्याची प्रक्रिया जितक्या मोठ्या प्राणात आत्मसात केली जाईल, जेंव्हा स्त्रियांच्या जातीवर्गपुरुषसत्तेने घडविलेल्या प्रतिमा, त्यातील फोलपणा उमगू लागतो तसतसे आपला (स्त्री असो कि पुरुष) स्त्रियाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलत जातो. कनिष्ठ जातीतून आलेल्या स्त्रीपुरुषांवर लादली जाणारी असाह्यता, दुबळेपणा, उरबडवेपणा, नकारात्मकता, किंवा उच्च जातीतील स्त्री पुरुषांना मिळणारी श्रेष्ठता, अहंकार, संरक्षण, सुविधा इ. समजून घेत त्याची चिकित्सा करणे, विचार करणे आणि मात करणे गरजेचे असते. या अर्थाने व्यतिगत पातळीवर जन्माधिष्ठितेवर मात करता येऊ शकते.

पुण्यात प्रियांका सातपुते या युवा फोटोग्राफर मुलीच्या फोटोंचे प्रदर्शन बालगंधर्व रंगमंदिरच्या कलादालनात आयोजित करण्यात आले, ते पहाताना, फोटो, फोटोग्राफर, जाती-वर्ग, सामजिक आशय, जाणीव-नेणीवा अशा विचारांनी मनार काहूर उठले. कारण याच ठिकाणी अनेक चित्र, फोटो प्रदर्शने पहिली होती. काही खूप भावली, आवडली होती. पण हे प्रदर्शन पाहताना ज्या पद्धतीच्या विचारांनी काहूर माजवले तसे आधी फारसे झाले नव्हते. प्रियांका सातपुते आणि तिचा जीवनसाथी बालाजी वाघमारे दोघांशी खूप गप्पा झाल्या. फोटोबद्दल चर्चा झाली. या प्रदर्शनाची निर्मिती प्रक्रियाही महत्वाची होती. अप्रतिम फोटो काढले प्रियांकाने. तिचे वडील रवींद्र सातपुते अहमदनगर मध्ये कला शिक्षक, हे सत्यशोधक- पुरोगामी विचारांचे. घरात मिळालेल्या मोकळ्या वातावराणातून प्रियांका वाढलेली. मुलीच्या हातात क्यामेरा काय देता? शोभात का मुलीच्या जातीला? असे अनाहूत सल्ले देणाऱ्या मित्रपरिवाराकडे दुर्लक्ष करत तिचा छद जोपासला गेला होता. पुढे याच क्षेत्रात प्राविण्य संपादन केलेला जीवनसाथी तिला मिळाला. ४-५ वर्ष जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या क्यामेरासोबत काढलेले फोटो प्रदर्शित करण्याच या दाम्पत्यान ठरवल.

बालगंधर्व कला दालनात प्रदर्शनाची आदली रात्र. प्रियांकाचे सासरे, सासू, आई, वडील सारे हजर. फोटो फ्रेम बनवण्याच काम सुरु होत. सासरेबुवा सुनेच्या फोटोंसाठी फ्रेम बनवायला लगबगीन पुढे आले. सुती साड्यांनी फ्रेम झरझर तयार करू लागले. फ्रेमला अचूक खिळे ठोकु लागले. पूर्वी फक्त चपलाना खिळे ठोकण्याचेच काम जाती समाजाने लादलेले. चपलाना खिळे ठोकणारे हात ‘मी’ चा शोध घेणारे फोटो काढणाऱ्या सुनेच्या फोटो प्रदर्शनासाठी आनंदाने सरसर चालत होते. पुरुषी अहंगंड आणि ‘नवरेशाही’वर मात करायला निघालेला नवरा बालाजी लगबगीने फोटोंची मांडणी वैशिष्ठपूर्ण कशी होईल हे पाहत होता. दारावर येणारा कलईवाला, तांड्यासोबत आलेल्या कष्टकरी स्त्रिया, त्यांची निरागस पोर, लेथ मशीनवर काम करणारे हाथ, गरिबांच घर आणि ‘मी’ घराबाहेर पडल्यावर दिसलेलं भिंतीबाहेरच जग असे विविध विषय प्रियांका सातपुतेने आपल्या क्यामेरात टिपले आहेत.

कलादालनात चित्रप्रदर्शनाची सुरवात गौतम बुद्धांच्या पुतळ्यापासून होते. काशाय  (गेरुआ) साडीच्या सजावटीन बुध्द भेट आनंददायी होते. पहिल्या भिंतीवर आजवर न मांडल्या गेलेल्या ‘भारतीय स्त्रिया’ भेटतात.

५ ते ८० वय वर्ष असणाऱ्या या देशी स्त्रिया, त्यांचे अप्रतिम असे सौंदर्य- त्यांचे दिसण, त्याचं असण, त्यांचे कष्टाने रापलेले चेहरे-करारी चेहरे, निरागस चेहरे, त्यांचे दात-मशेरीन कालेकुटट झालेले, मोठे-पांढरेशुभ्र! एखादा पडलेला, त्याच जगण सहजच अधोरेखीत होत आणि भावतही! प्रियांकासाठी त्या ‘मॉडेल’ ठरल्या आहेत हे महत्वाच आहे.

दुसऱ्या भिंतीवरील फोटो पहिल्यावर चारभिंतीतून बाहेर पडलेली एक सामर्थ्यवान बाई भिंतीबाहेरच जग कस बघते? हे प्रभावीपणे पुढे येत होत. त्यात, भिंती पलीकडे डोकावण आहे. भिंतीचा अडसर पार करत दिसणारा प्रकाश आहे.

 ‘हे असे असले तरी, हे असे असणार नाही’ या सुरेश भटांच्या ओळी हे पाहताना ओठी आल्याशिवाय राहिल्या नाहीत. भविष्यकाळ सुंदर करण्याचा, नवी पहाट येणार आहेचा आशावाद फोटोत सामावला गेला आहे. एक भिंत काळ्या आणि पांढऱ्या रंगांच्या फोटोनी व्यापलेली होती. त्यात आभाळाला गवसणी घालणाऱ्या नजरा लाक्षवेधी आहेत. ती माणस म्हणजे जमिनीवर पाय असणारी माणस आहेत. काळ्याकुट्ट चौकटीत प्रकाशाच्या झरोक्यात आपल स्वतंत्र अस्तित्व दिमाखात मिरवणारी बदली ‘ती’च प्रतिक वाटत राहते. एका भिंतीवर सौंदर्य प्रसाधन आणि नटत असलेल्या स्त्रिया भेटतात. आरसा या माध्यमाचा उत्तम वापर यात झाला आहे. जातीवार्गानुसार उपलब्ध असणारी सौंदर्य प्रसाधन चपखलपणे फोटोतून साकारली आहेत. कनिष्ठ जातीवार्गातील स्त्रियांचा मेकप कीट – काजळ, कुंकू, चेहऱ्याला पावडर इतकाच! मेकअप कोण कशासाठी तर कोणाला कशासाठी करावा लागतो हाही विचार पुढे आला आहे. भटक्या मुलींचा फोटो र्हुदयात घर करतो. तर आरश्याला घुंगर अडकून चेहरा रंगवावा लागणारी भगिनी काळजाचा वेध घेते. स्वतः ऐवजी  देवीच्या मूर्तीला रंगवून पोटाची खळगी भरू पाहणारी मैत्रिण मनात घर करून जाते.

कष्टकरी भिंत आगळीवेगळी, महत्वाची आहे. त्या भिंतीवर एकूण १४-१५ फोटो आहेत. कष्टाची काम करतानाचे स्त्री-पुरुष त्यात भेटतात. लेथ मशीनवर ताकद लाऊन काम करणारे हात आहेत, माश्यांचा भार डोक्यावर घेऊन जाणारी कोळी स्त्री आहे, शेतात – मातीत काम करणारी शेतकरी स्त्रीचे मातीतील पाय आहेत, कुलूप विकाणी व्यक्ती आहे, इरलं विणण्यात मग्न व्यक्ती आहे.

 या सर्वांसोबत एक फोटो आहे तो चुलीचा. तवा, फुकणी, पातेल, पितळी त्यात दिसतात. ‘अपार कष्ट’ हा थीम मध्ये स्वयंपाकाचे काम प्रियांकाने समाविष्ट केले हा फार महत्वाचा विचार आहे. कारण स्त्रियांच्या गृह्श्राम हे उत्पादक श्रम असतात हा सिद्धांत मानायला आजही समाज, राज्यसंस्था, धर्म, रूढी-परंपरा तयार नाहीत. स्त्रियांनी मासे किंवा अन्य काही वस्तू इ. बाजारात विकणे हे ‘श्रम’ मानले जातात, लेथ मशीनवर काम करणे हे श्रम मानले जातात पण त्याच स्त्रियांनी केलेल्या घरकामाची मोजदाद ‘श्रमा’ मध्ये केली जात नाही. १९ व्या शतकात म. फुले यांनी कुळबीण अखंड लिहिला आहे. त्यात स्त्रियांच्या गृह्श्रामाची दाखल घेतली होती. नंतरच्या काळात स्त्रीवाद्यांनी हा मुद्दा पुढे आणण्याचा प्रयत्न केला होता. परंतु अद्यापही स्त्रियांच्या गृह्श्रामाला गृहीतच धरण्यात आले आहे.

प्रियांकाने काढलेले फोटो सामाजिक भान असणारे आणि देणारे असे आहेत. जीवनाकडे बघण्याचा एक आशावाद त्यातून जाणवतो. फुटक्या आरश्यात चेहरा बघू नये असा पारंपारिक समज आहे. नशीब फुटक निघत असे सांगितले जाते. पण या जातिग्रस्त समाजाने ज्याचं आयुष्यच फुटक बनवल त्यांना काय या फुटक्या आरश्याचा भय? फुटका संसार सांभाळणाऱ्या या कनिष्ट जातीतील स्त्रीला प्राधान्य देत फुटक्या आरश्यात बघत कुंकू हसत मुखान लावणारी स्त्री क्लिक करण निराळच आहे. स्त्री – ‘ती’चे फोटो मास्टरपीस आहे. ती इतकी त्या ओझ्यान वाकलेली आहे कि तिचा चेहराच हरवला आहे, तो दिसत नाही, दिसतात ते फक्त भारन वाकलेले तिचे पाय ! आजवर ‘गृहीत धरलेल्या’ माणसाना, श्रमाना, जातींना आपले नायिका-नायक म्हणून पुढे आणणे फारच महत्वाचे आहे. हे सत्यशोधकी जाणीव नेणीवामधून साकारलेल एक फोटो प्रदर्शन एका प्रवासाची सुरुवात आहे. निर्हुतीच्या लेकीचा हा प्रयत्न म्हणूनच महत्वाचा आहे.

प्रा. प्रतिमा परदेशी


       
Tags: phorographypratimapardesisatyashodhakvidrohi
Previous Post

आपले शहर जे त्यांनी निर्माण केले

Next Post

शोधाची नवी वाट : थेरीगाथा नवे आकलन

Next Post
शोधाची नवी वाट : थेरीगाथा नवे आकलन

शोधाची नवी वाट : थेरीगाथा नवे आकलन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Dhamma Chakra Pravartan Din 2025 : मोदींना टाटा, बाय बाय करा आणि देश वाचवा; ओबीसी समाजाने वेळीच सावध व्हावे – ॲड. प्रकाश आंबेडकर
बातमी

Dhamma Chakra Pravartan Din 2025 : मोदींना टाटा, बाय बाय करा आणि देश वाचवा; ओबीसी समाजाने वेळीच सावध व्हावे – ॲड. प्रकाश आंबेडकर

by mosami kewat
October 3, 2025
0

अकोल्यात धम्म मेळाव्याला उसळला जनसागर अकोला : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अकोला येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य धम्म मेळाव्यात वंचित बहुजन...

Read moreDetails
Dhamma Chakra Pravartan Din : सत्ताधारी समाज कायम वंचितांना वंचित ठेवतो – अंजलीताई आंबेडकर 

Dhamma Chakra Pravartan Din : सत्ताधारी समाज कायम वंचितांना वंचित ठेवतो – अंजलीताई आंबेडकर 

October 3, 2025
मनुवाद्यांनी उच्चशिक्षित युवकांना संपवले; सुजात आंबेडकर यांचा आक्रोश, आरक्षणासाठी शेवटपर्यंत लढण्याचा निर्धार

मनुवाद्यांनी उच्चशिक्षित युवकांना संपवले; सुजात आंबेडकर यांचा आक्रोश, आरक्षणासाठी शेवटपर्यंत लढण्याचा निर्धार

October 3, 2025
महिला-शेतकरी-विद्यार्थ्यांवरील अन्यायावरून वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक; अकोला धम्म मेळाव्यात सरकारवर हल्लाबोल

महिला-शेतकरी-विद्यार्थ्यांवरील अन्यायावरून वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक; अकोला धम्म मेळाव्यात सरकारवर हल्लाबोल

October 3, 2025
धम्मचक्र प्रवर्तन दिन: अकोल्याच्या ऐतिहासिक धम्म मेळाव्यात अंजलीताई आंबेडकर यांचे आगमन

धम्मचक्र प्रवर्तन दिन: अकोल्याच्या ऐतिहासिक धम्म मेळाव्यात अंजलीताई आंबेडकर यांचे आगमन

October 3, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home