पिंपरी चिंचवड : विकसित औद्योगिक शहरामध्ये पिंपरी चिंचवड अग्रेसर आहे. मात्र विकसित शहरांमध्ये प्रदूषणाच्या समस्येवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवणे तितकेच महत्वाचे आहे. या बाबतच महापालिकेचे आयुक्त यांनी आपले स्पष्टीकरण दिले आहेलो एमिशन जोन्स’सारख्या संकल्पना केवळ पर्यावरणपूरक नसून, त्या शाश्वत नागरी जीवनशैलीच्या दिशेने उचलेले एक महत्त्वाचे पाऊल असते. असे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.
यावेळी वाहनांमुळे निर्माण होणारे प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी हरित उपक्रमांना चालना देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका आणि ब्रिटिश उच्च उपायुक्त मुंबई तसेच ट्रान्सपोर्ट फॉर लंडन यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचा समारोप आयुक्त सिंग यांच्या उपस्थित झाला.
यावेळी आयुक्त सिंह म्हणाले, ‘या कार्यशाळेच्या माध्यमातून तांत्रिक सुसज्जता, सामाजिक सहभाग आणि प्रशासकीय समन्वय या तिन्ही पैलूंवर विचारमंथन झाले. चर्चेतील निष्कर्ष हे शहराच्या प्रदूषण नियंत्रण धोरणांना अधिक बळकट करतील. हवेतील प्रदूषणाचे कमी उत्सर्जन क्षेत्रे योजनेचे नियोजन करताना त्यामध्ये विविध घटकांचा, विभागाचा सहभाग कसा सुनिश्चित करायचा, यावर या कार्यशाळेत चर्चा झाली. यात वाहतूक सेवा पुरवठादार, व्यापारी, उद्योजक, नागरिक, शासकीय यंत्रणा आदी सर्व संबंधित हितधारकांचा अभ्यास व समावेश यावर मार्गदर्शन करण्यात आले.






