Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home सामाजिक

प्रखर आंबेडकरी विचार पेरणारा गायक – वामनदादा कर्डक

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
May 19, 2021
in सामाजिक
0
प्रखर आंबेडकरी विचार पेरणारा  गायक – वामनदादा कर्डक
       

मी १९७९ ला औरंगाबादला शिक्षणासाठी आलो, तेव्हापासून वामनदादांना  ट्राउजर-कुर्त्यातच पाहत होतो.  भरपूर उंची, गौर वर्ण, धारदार नाक, बोलके डोळे आणि  डोक्यावरचे बरेचसे केस नामशेष झालेले. चार- चौघात उठून दिसेल अशी मूर्ती. आपल्या अमोघ वाणी आणि लेखणीच्या बळावर प्रखर आंबेडकरनिष्ठा जपत आयुष्यभर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर गुजराथ, राजस्थान, मद्रास, मध्यप्रदेश, कर्नाटक, भोपाळ, आंध्र आदी प्रांतातून  गायनातून विचार पेरण्याचे काम करणारा हा कर्ता सुधारक.      रूढार्थाने फारसे औपचारिक शिक्षण नसलेला हा गायक कलावंत निखारा फुलावा तसा फुलला. शब्दांना स्वरांची साथ देत तहहयात गावा-गावात, वस्त्या-वस्त्यांवर, झोपडी- झोपडीत पायाला भिंगरी बांधून भीम गुणगान करण्यात व्यस्त राहिला. त्यांनी जीवनाच्या वाटा तुडवत आणि निरोगी शब्दांच्या संगतीने माणसांशी नाते जोडले.

  वामनदादा म्हणजे वामन  कर्डक.सिन्नर तालुक्यातील  देशवंडी (जि. नाशिक) या खेड्यात १५ ऑगस्त १९२२ मध्ये तपाजी आणि सईबाई यांच्या पोटी जन्मले. वामनदादा  अवघ्या  तीन वर्षांचे असतानाच वडिलांचं छत्र हरवलं. काही दिवस खेडेगावातच गुरं-ढोरं राखण्याचे काम केले. थोरले बंधू  मुंबईला गिरणी मजूर म्हणून कामाला होते.  वयाच्या अकराव्या वर्षी मुंबईला भावाकडे कामधंद्यासाठी रवानगी. गिरणीत काम मिळाले. पुढे गिरणी बंद पडली. मग, सायनच्या वखारीत कोळसा वेचायचा आणि कुर्ल्याला नेऊन विकायचा, पोटाची खळगी भरण्यासाठी ही दिनचर्या सुरू झाली. एका मजुराने पत्र वाचण्याची विनंती केली. पत्र वाचता येईना, ही बाब वामनदादांच्या मनाला खूप लागली. मग, प्रयत्नपूर्वक आठ दिवसात बाराखडी पाठांतर केली, पुस्तकांचे वाचन सुरू केले. चित्रपट पाहून, वाचनाअंती त्यांच्यातला गीतकार जागा झाला. भीमराव कर्डक, शाहीर भोसले, शाहीर हेगडे, शाहीर सोनवणे  आदी मंडळींचे  जलसे पाहून चळवळीकडे पाहण्याची एक वेगळी समज येऊ लागली.

  साधारणतः १९५० मध्ये वामनदादा नाशिक येथे स्थायिक झाले. औरंगाबाद येथे  बाबासाहेब आले असता  त्यांनी बाबासाहेबांची भेट घेऊन बाबासाहेबांचा सहवास मिळविण्याच्या उद्देशाने “काहीतरी काम मिळेल काय?” अशी विचारणा केली. यावेळी मिलिंद महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरू होते. बाबासाहेब स्वतः बांधकामाकडे लक्ष देत.  बांधकाम सुरू असताना बाबासाहेब उन्हात उभे असत तर त्यांना ऊन लागू नये म्हणून ‘बाबासाहेबांच्या डोक्यावर छत्री धरण्या’चे काम वामनदादांना मिळाले,  ते अत्यंत प्रामाणिकपणे आणि निष्ठापूर्वक त्यांनी केले. कॉलेजचे काम संपल्यानंतर बाबासाहेब मिल्ट्री एरियातील छावणीमध्ये तीन नंबरच्या बंगल्यावर थांबत. तेथे भेटणाऱ्यांशी संवाद साधत तेव्हा  त्यांच्या टेबलापासून तीन फूट अंतरावर बसून वामनदादा  काळजीपूर्वक ऐकत.

  अखिल मानवमुक्तीसाठी लढा देणाऱ्या  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या  आंदोलनाचा एक सजग प्रहरी, चळवळीचा एक डोळस साक्षीदार  म्हणून वामनदादांकडे बघावे लागेल. त्यांनी आपल्या प्रतिभाशक्तीच्या जोरावर असंख्य कविता व गीत रचना केली.  लोकभाषेत आकलन सुलभ रचना सादर केल्या, तद्वतच बहिष्कृत मानवतेचे दुःखही तितक्याच सजगपणे उद्धृत केले. ते गायला लागले की ,श्रोते मंत्रमुग्ध होऊन ऐकत. मानधनासाठी त्यांनी कधीही हट्ट धरला नाही. उलट, मिळेल त्या बिदागीवर कधी- कधी तर फुकटातच कार्यक्रम सादर केले. आपल्या सुरेल  स्वराद्वारे  समकालीन  भयाण समाजवास्तव मांडत अनेक  सवाल उपस्थित केले. ते विचारतात,

‘सांगा आम्हाला  बिर्ला  बाटा टाटा  कुठाय हो?

सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठाय हो? ।धृ।

घाम शेतात आमचा गळं

चोर ऐतंच घेऊन पळं

धन चोराचा त्या पळण्याचा फाटा कुठाय हो?।१।

न्याय वेशीला टांगला सदा

माल त्यांचा की आमचा वदा

करा निवाडा आणा तराजू काटा कुठाय हो।२।

रोज मिठात शिजती तुरी

तिथं काटा मुर्गी सुरी

वामनदादा आमचा घुगरी घाटा कुठाय हो?।३।

  चळवळीची होत असलेली वाताहत पाहून त्यांचे काळीज तीळ- तीळ तुटत असे. मनातील  सात्विक संताप व्यक्त करताना  ते विचारतात,

‘मला चीड येत नाही हाच माझा गुन्हा

दोष देऊ कुणा सांगा दोष देऊ कुणा?’

समस्त शोषितांकडून  शोषकांस प्रातिनिधिक स्वरूपात विचारलेला हा सवाल असून, प्रस्थापितांना आत्मचिंतन करण्यासाठी ही जबरदस्त चपराक आहे, असेच म्हणावे लागेल.

  युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर तर वामनदादांचे प्रेरणापुरुष. बाबासाहेबांवर तर त्यांनी शेकड्याने गीतं लिहिली, गायली. गावोगाव फिरत असताना दादा एकटेच जात. मग, तेथील स्थानिक वाद्यवृंदाच्या सहाय्याने कार्यक्रम केले जायचे. एक पाय दुमडून ते स्टेजवर बसत. प्रसंगी वाद्यवृंदास व कोरस देणाऱ्यास हातवारे करून सूचना, मार्गदर्शन करायचे. कार्यक्रमाची सुरुवात वाद्याचा एखादा तोडा आणि एखाद्या शेराने होई. ते औरंगाबादला आले म्हणजे प्रा.मनोहर गरुड यांच्याकडे थांबत.अलीकडे ऋषिकेश कांबळे यांच्याकडेही येत.

खेड्यापाड्यातही त्यांचे कार्यक्रम होत.दलित राजकारण या विषयावर गाताना–

 ‘भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते

 तलवारीचे तयांच्या न्यारेच टोक असते’

ही वस्तुस्थिती मांडत–

‘सांगू किती मी दादा एकतेने येथे नांदा’

अशी विनवणी  आपल्या कवणातून करायचे.

 गतायुष्याचे वर्णन करताना–

‘गणतीच माझी गुलामीत होती

जिंदगीच माझी सलामीत होती’

किंवा

‘तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे

तुफानवारा, पाऊसधारा मुळी न आम्हा शिवे’

असे म्हणताना ते संपूर्ण शोषित वर्गाची कैफियत मांडतात, तेव्हा साहजिकच त्या भावना ‘मी’ च्या न राहता ‘आम्ही’ च्या बनतात.

 डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणजे येथील शोषितांचे उर्जास्थान.त्यांचे गुणगान करताना वामनदादांना शब्दाच्या पाठीमागे धावण्याची गरज पडत नाही. ते  बाबासाहेबांना आई संबोधून –

‘तुझीच कमाई आहे गं भिमाई

कुणाचेच काही इथे कष्ट नाही’

ही कृतज्ञता व्यक्त करीत-

‘जिवाला जिवाचं दान माझ्या भीमानं दिलं

झिजवून जिवाचं रान माझ्या भिमान केलं’

असे गुणगान करायचे, तेव्हा श्रोत्यातून टाळ्यांचा गजर झाल्याशिवाय रहात नसे. अत्यन्त दुःखी कष्टी होऊन ते श्रोत्यांना गीताद्वारे प्रश्न उपस्थित करीत-

‘वाळुनी चालला उभा जोंधळा

कोण राखील माझ्या भीमाचा मळा?’

 आत्मचिंतन करणाऱ्या ह्या ओळी श्रोत्यांच्या हृदयाचा ठाव घेत.

‘बाई मी भिमाची भिमाची लेखणी’ म्हणत असतानाच

‘काय सांगू तुला आता भीम माझा कसा होता

लेकराला जशी माता भीम माझा तसा होता’

कारुण्याच्या प्रहरी असणाऱ्या ह्या ओळी निश्चितच श्रोत्यांची मने हेलावून टाकायच्या.

‘उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे’

या गीताने तर वामनदादा घराघरात पोहोचले.

‘पहाट झाली प्रभा म्हणाली भीमजयंती आली

चांदाची चांदणी येऊन खाली वारा भीमाला घाली’

 असे भीम गुणगान करणारी रचना–

किंवा जातककथेतील आम्रपाली उभी करताना —

  ‘गुलाबाची लाली वसे गौर गाली

  पिंपळाच्या झाडाखाली आली आम्रपाली’

अशा सारख्या एकाहून एक सरस  रचनामुळे श्रोत्यांनी त्यांना अक्षरशः डोक्यावर घेतले होते.

  मला आठवतं, साधारणतः १९९४ मध्ये सिल्लोड (जि. औरंगाबाद)येथील स्नेहनगरमध्ये वामनदादांचा कार्यक्रम आयोजित केला होता.कोरस द्यायला 2औरंगाबादहून दोघा– तिघांना ते सोबतच घेऊन आले होते. वामनदादा आता बरेच थकल्यासारखे दिसत होते. संपूर्ण कार्यक्रमात त्यांनी केवळ दोन गाणी गायली. बाकी त्यांची शिष्यमंडळी उत्तररात्रीपर्यंत गात होती. दुसऱ्या दिवशी आम्ही दादांची भेट घेऊन त्यांचेशी संवाद साधला. त्यांना बोलते केले. समकालीन समाजकारण, राजकारण,शोषितांची  चळवळ आदी विषयासंबंधी त्यांनी  सचिंत दुःख व्यक्त  केले. विविध ठिकाणी भ्रमंती करीत असताना अनेक भले- बुरे अनुभव आल्याचे सांगितले.दलित राजकारणी मंडळी गर्दी जमविण्यासाठी आपल्या कार्यक्रमाचा कसा उपयोग करतात, मग कसे आपली अवहेलना करतात, असा सूर जाणवत होता.

 आंबेडकरी गीतांशिवाय पारिवारिक  नातेसंबंधाच्या सुखदुःखाची किनार असणाऱ्या रचनाही त्यांनी केल्यात. साधे- साधे प्रसंगही किती उत्कटतेने उभे केलेत, वानगीदाखल ही रचना बघा:

एका संपन्न एकत्र कुटुंब असलेल्या ग्रामीण  नवविवाहितेच्या भावना व्यक्त करताना-

‘मीच माझे सासरी सकाळी उठोनी

घुसळोनि ताकलोणी काढीत होते माय वं’

 किंवा–

एका नवविवाहित पुरुषाच्या भावनांना वाट मोकळी  करून देताना–

‘सांगा या वेडीला माझ्या गुलछडीला

हिच्यासाठी आलो मी सासुरवाडीला

शेवटी-

बसून चावडीला त्या ‘वामन’च्या  जोडीला

हिच्यासाठी आलो मी सासुरवाडीला

सांगा या वेडीला…’

(नंतर हे गीत ‘सांगते ऐका’ ह्या चित्रपटात घेतले.)

अशा सारखी गीतरचना करण्यासाठी किती सूक्ष्म निरीक्षण करावे लागले असेल,हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

  वामनदादांची ही मुक्तछंदातील खालील  कविता म्हणजे त्यांचे स्व- कथनच(आत्मकथन) म्हणता येईल.ते म्हणतात,

‘माझ्या जन्मापासून लोक सारंच पाहत आले

बालवयातला  वामन

सावकाराच्या शेतातला

तीन लाकडाच्या झोळीतला वामन

गुरं चारताना, डोंगर दरी कपारी

चढणारा वामन,

मुंबई पाहणारा वामन,

कोळसा वेचणारा वामन,

माती उपसणारा वामन,

मिल कामगार वामन,

बुद्ध, फुले, आंबेडकरांची

कास धरणारा वामन

देव , दैव, आत्मा, पुनर्जन्म

नाकारणारा वामन…’

अशी आहे वामनदादांची अजोड बुद्धिनिष्ठा आणि प्रखर आंबेडकरनिष्ठा.

  वामनदादा म्हणजे धगधगत्या शब्दांचा नि सुरेल गळ्याचा जादूगार. असंख्य मैफिलीत रंगत भरणारा कलावंत. वास्तवाची जाण आणि भान राखत अत्यन्त जड अंतकरणाने गायलेल्या गीताच्या ह्या ओळी पहा:

‘पाहिले ना जे कधी जे आज आम्ही पाहतो

जात असता माऊलीची लाज आम्ही पाहतो’

आणि शेवटच्या कडव्यात तर ते अधिकच हतबल होऊन म्हणतात–

‘संपला ‘वामन’ तयाचे गीत आता संपले

संपलेल्या गायनाचा साज आम्ही पाहतो’

वामनदादांनी सुमारे चार हजारांहून अधिक गीते, कविता लिहिल्यात. दीड हजार गीते नगरमधील माधवराव गायकवाड यांनी संग्रहित केली आहेत.(हिंदीतील वेगळ्या) त्यांचे  ‘वाटचाल,’ ‘मोहोळ,’  ‘हे गीत वामनाचे’ असे मोजकेच कवितासंग्रह पुस्तकरूपाने आलेत ,तर वामनदादांवर प्रेम करणाऱ्या काहींनी त्यांच्या गाण्याच्या कॅसेट्स काढलेल्या आहेत. खरे तर  पडद्याआड असलेला हा फार मोठा सामाजिक ठेवा आहे. हा ठेवा वाचक – श्रोत्यांसमोर आला पाहिजे. महाराष्ट्रात वामनदादांचे शिष्य म्हणविणारी भरपूर गायक मंडळी आहे, त्यांनी ही परंपरा पुढे नेणे गरजेचे आहे. लोककवी हे बिरुद वामनदादांनी स्वतः  लावून घेतलेले नाही. औरंगाबाद येथे एका जाहीर कार्यक्रमात वामन निंबाळकर यांनी लोकांच्या वतीने ही पदवी त्यांना बहाल केली आहे. 

  वामनदादांवर प्रेम करणारे, त्यांचेशी आस्था असणारे असंख्य आंबेडकरवादी आहेत, त्यांनी दादांचे पडद्याआडचे साहित्य प्रकाशात आणण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.

  ‘असं एक गाव नाही

   वामन जिथे नाव नाही’

असं आपल्या कवितेत औरंगाबाद येथील सिद्धार्थ मुकुंद जाधव या कवीने म्हटलंय, आपण तरी यापेक्षा वेगळे काय म्हणणार?

— प्रा. शिवाजी वाठोरे

(लेखक प्रख्यात समीक्षक, सामाजिक चळवळीचे अभ्यासक आहेत.)


       
Tags: ambedkarvadikaviwamandadakardak
Previous Post

जि.प.कोव्हिड सेंटरमधील रुग्णांच्या करमणुकीसाठी एलईडी टिव्हीची भेट, व्यापारी नेते मनोहर पंजवाणींनी जोपासली सामाजिक बांधिलकी

Next Post

गरीब मराठ्यांनी स्वतंत्र अस्तित्व निर्माण करावे!

Next Post
गरीब मराठ्यांनी स्वतंत्र अस्तित्व निर्माण करावे!

गरीब मराठ्यांनी स्वतंत्र अस्तित्व निर्माण करावे!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Pune : वंचित बहुजन आघाडी पुणे शहराच्या वतीने जनता दरबार
बातमी

Pune : वंचित बहुजन आघाडी पुणे शहराच्या वतीने जनता दरबार

by mosami kewat
July 6, 2025
0

पुणे : वंचित बहुजन आघाडी, पुणे शहर कार्यकारिणीच्या वतीने आयोजित जनता दरबार नुकताच पार पडला. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अनिल...

Read moreDetails
मुख्याध्यापकांशिवाय तब्बल 200 शाळा! मुंबई महानगर पालिकेच्या शाळांची स्थिती

BMC School Staff Shortage : मुख्याध्यापकांशिवाय तब्बल 200 शाळा! मुंबई महानगर पालिकेच्या शाळांची स्थिती

July 6, 2025
अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसवर गंभीर आरोप; अनुसूचित जातींच्या बनावट सर्वेक्षणाचा कट ‎

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसवर गंभीर आरोप; अनुसूचित जातींच्या बनावट सर्वेक्षणाचा कट ‎

July 6, 2025
यांना संविधान आणि समता दोन्हीही खूपत आहेत

यांना संविधान आणि समता दोन्हीही खूपत आहेत

July 6, 2025
Ashadhi Ekadashi 2025 :वंचित बहुजन आघाडीकडून आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांना पाणी वाटप ‎ ‎

Ashadhi Ekadashi 2025 :वंचित बहुजन आघाडीकडून आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांना पाणी वाटप ‎ ‎

July 6, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क