Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home सांस्कृतिक

दृढ ऐक्याचा हक्क

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
April 10, 2021
in सांस्कृतिक
0
दृढ ऐक्याचा हक्क
       

सुभाष कपूर ह्यांचा नवीन चित्रपट, ‘मॅडम चीफ मिनिस्टर’ (२०२१) हा चुकीच्या कारणांसाठी प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. एक काल्पनिक कहाणी असली तरी हा चित्रपट उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती ह्यांच्या आयुष्यावर बेतलेला आहे असे म्हटले जाते. चित्रपटाच्या पोस्टरवरून आणि रिचा चढ्ढा (चित्रपटाची नायिका) ह्यांच्या ट्वीट्समुळे जो वादंग उसळला तो ह्या प्रकाशनाच्या वाचकांना चांगलाच माहित असेल. थोडक्यात सांगायचे तर ह्या संपूर्ण चित्रपट प्रकल्पाला छुप्या जातीयवादाचा दर्प येतो.

ह्या चित्रपटाच्या पोस्टरमधूनच ठराविक साच्याच्या एका अक्षम्य जातीयवादाचे केले गेलेले प्रकटीकरण ज्यांना दिसले व जाणवले त्यांना ह्यातून निर्माण झालेल्या समस्याही सहज कळतील: पोस्टरमध्ये रिचा चढ्ढा मळक्या लक्तरांमध्ये दिसते, तिच्या हातात उगारलेला झाडू आहे आणि पोस्टरची टॅगलाईन आहे: ‘अनटचेबल, अनस्टॉपेबल’ (अस्पृश्य, अनवरोध. तरीही एक मोठा प्रश्न उरतोच. तो म्हणजे ‘ऐक्याचा एल्गार’ आणि प्रतिनिधित्वाचे नीतिशास्त्र. ह्या प्रश्नाचा सखोल विचार करणे गरजेचे आहे. ह्या मुद्याचे अधिक विवरण करण्यासाठी १९७० सालातील एका माहितीपटाचे (मीटिंग द मॅन: जेम्स बॉल्डविन इन पॅरिस) मी उदाहरण घेते.   

जेम्स बॉल्डविन हे अमेरिकन लेखक – अ‍ॅक्टिव्हिस्ट  आहेत. त्यांनी वयाच्या २४ व्या वर्षी नोव्हेंबर १९४८ मध्ये पॅरिसला स्थलांतर केले. तेथेच त्यांनी आपले बरेचसे ऊर्वरित आयुष्य व्यतीत केले. १९७० मध्ये टेरेन्स डिक्सन हा चित्रपट निर्माता ‘बॉल्डविन्स पॅरिस’ ह्या माहितीपटाची निर्मिती करण्याच्या उद्देशाने त्यांना भेटला. ह्या वेळेपर्यंत बॉल्डविन हे एक मोठे लेखक म्हणून ख्यातनाम झालेले होते.  गियोव्हानीज रुम (१९५६), अनदर कंट्री (१९६२), द फायर नेक्स्ट टाईम (१९६५) आणि टेल मी हाऊ लॉंग द ट्रेन्स बीन गॉन (१९६८) ही त्यांची पुस्तके प्रकाशित झालेली होती. अमेरिकन नागरी हक्क चळवळीतील (अमेरिकन सिव्हिल राईट्स मूव्हमेंट) एक बुलंद आवाज म्हणूनही ते प्रसिद्धी पावलेले होते. ही चळवळ संस्थात्मक वंशविद्वेष आणि काळ्या अमेरिकन नागरिकांच्या बाबतीत होणाऱ्या  भेदभावाविरुध्द लढा देण्यासाठी सुरु झाली होती. तसेच, समलिंगी नागरिकांच्या हक्कांसाठीच्या चळवळीमध्येही (गे राईट्स मूव्हमेंट) त्यांचा सहभाग होता. ह्या २७ मिनिटांच्या माहितीपटामध्ये काळ्या अमेरिकनांच्या लढ्याचे उत्तम चित्रीकरण केलेले आहे. त्यातून प्रेक्षकांना ऐक्याच्या संदर्भातील गुंतागुंतींची कल्पना येते. मॅडम चीफ मिनिस्टरवरील चर्चेच्या संदर्भात हीच गुंतागुंत लक्षात घ्यायला हवी..

पॅरिसमध्ये हद्दपार असलेल्या एका काळ्या अमेरिकन लेखकाच्या नजरेतून पॅरिसचे दर्शन घडविणे हे टेरी डिक्सनचे उद्दिष्ट होते. वरवर पाहता हा अगदी उदात्त हेतू वाटतो. परंतु माहितीपटाचे चित्रीकरण सुरु झाल्यावर काही काळाने बॉल्डविनचे सहकार्य कमी कमी होत गेले. त्यांनी पॅरिसबद्दल किंवा स्वत:च्या कामाबद्दल बोलायचे नाकारले. त्याऐवजी त्यांनी, एक गोरा युरोपियन चित्रपट निर्माता आणि एक यूरोपमध्ये हद्दपार असलेला काळा अमेरिकन लेखक ह्यांच्यामधील क्लेशदायक नातेसंबधांचे दर्शन पडद्यावर करून द्यायला सुरुवात केली. माहितीपटाचे बहुतांश चित्रीकरण पॅरिसच्या अल्जीरियन मोहल्ल्यात करण्यात आले. तेथे प्रामुख्याने अल्जीरियन स्थलांतरित लोकांची वस्ती होती. बॉल्डविन ह्यांना येथे मित्र मिळाले, आधार मिळाला. कारण बॉल्डविनना अल्जीरियन लोकांचे फ्रान्समधील अनुभव आणि काळ्या लोकांचे अमेरिकेतील अनुभव ह्यांत साम्य आढळले. अल्जीरियन लोकांना पॅरिसची चांगली माहिती होती आणि ह्या शहराला समजून घेण्यासाठी त्यांनी बॉल्डविनना मदत केली.

चित्रीकरणामध्ये बॉल्डविन ह्यांच्याबरोबर एक तरुण काळा माणूस असतो. बहुदा विद्यार्थी असावा. चित्रपटात तो कधी कधी लेखक आणि निर्माता ह्यांच्यामधील मध्यस्थ असतो. एका विशिष्ट दृश्यामध्ये चित्रपटाच्या चमूला प्लेस डि ला बॅस्टिलच्या बाहेरच्या बाजूला चित्रीकरण  करायला सांगितले होते. ह्या जागेत पूर्वी तुरुंग होता. १७८९ मध्ये फ्रेंच राज्यक्रांतीच्या दरम्यान त्यावर हल्ला करून तो पाडून टाकण्यात आला. ह्या ठिकाणी बॉल्डविन ह्यांच्या मुलाखतीला जेव्हा सुरुवात होते, तेव्हा हा तरुण, दिग्दर्शकाला प्लेस डि ला बॅस्टिल अजूनही पॅरिसमधील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळ का आहे, असा प्रश्न बॉल्डविन ह्यांना विचारायला सांगतो. बॉल्डविन म्हणतात की हे सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे किंवा नाही हे महत्वाचे नाही. ह्या उत्तराने दिग्दर्शक चिडतो आणि बॉल्डविनवर हातचे राखून बोलत असल्याचा, मोकळेपणाने न बोलण्याचा व त्यामुळे चित्रीकरणामध्ये अडथळा निर्माण करण्याचा आरोप करतो. ‘आम्हाला, तुम्ही जसे आहात तसे का दाखवू देत नाही आहात? तुमच्या दृष्टिकोनातून ही गोष्ट का सांगू देत नाही आहात?’ असे डिक्सन त्यांना विचारतात.

ह्या प्रश्नाला बॉल्डविन ह्यांनी दिलेले उत्तर गहन आहे: “मी लेखक असण्यापेक्षाही अधिक प्रमाणात एक नागरिक आहे. राजकीय कैद्यांचा मी प्रतिनिधी आहे. अमेरिकेत किंवा युरोपात आपण काळा माणूस असणं म्हणजे काय हे मी चांगलं जाणतो. आमच्या कातडीच्या रंगामुळे आम्हाला मारलं जाऊ शकतं. मी त्यातून वाचलो आणि ह्या साऱ्याचा मी एक साक्षीदार आहे, एवढंच महत्वाचं आहे. जेव्हा एखादा गोरा माणूस तुरुंग पाडून टाकतो तेव्हा तो कैदेतून सुटतो, स्वतंत्र होतो. मी जेव्हा तुरुंग फोडतो तेव्हा मी रानटी ठरतो. कारण तुम्हीच (डिक्सनला उद्देशून) माझा तुरुंग आहात. तुमच्या सुटका वगैरे मी फार काळ सहन केलं. आता यापुढे ते मला परवडणार नाही.”

हा क्षण चित्रपटाला एक वेगळे वळण देणारा आहे. जणू काही बॉल्डविन ह्यांना, एका विशिष्ट विस्फोटक क्षणापर्यंत आपले विचार निर्मात्यासमोर उघड होऊ द्यायचे नव्हते. त्यानंतरच एक गोरा चित्रपट निर्माता आणि त्याचा काळा नायक ह्यांच्यातील नाते स्पष्ट केले जाते, त्याला वाचा फुटते; आणि हे घडते एका ऐतिहासिक स्थळी, कारावासातून सुटका होण्याबाबत  प्रतीकसमान असलेल्या स्थळी. काळ्या लोकांच्या, गौरेतर स्थलांतरितांच्या आणि समाजाच्या परिघावर जेमतेम स्थित असलेल्या समुदायांच्या सततच्या कारावासाला अधोरेखित करण्यासाठी हे होणे आवश्यक होते. ह्या प्रसंगाचा उपयोग आपल्याला मॅडम चीफ मिनिस्टर ह्या चित्रपटाच्या पेचाचे आकलन होण्यासाठी होऊ शकेल. एका माजी दलित स्त्री मुख्यमंत्र्याचे प्रातिनिधिक स्वरूप, एका उच्चवर्णीय अभिनेत्रीने, उच्चवर्णीय दिग्दर्शकाच्या दिग्दर्शनाखाली केलेल्या भूमिकेतून दर्शविले जाणे व त्याच्या प्रमुख पोस्टरवर तिचे दर्शन झाडू परजणारी, लक्तरे नेसलेली ‘अस्पृश्य’ स्त्री म्हणून होणे ह्यातील गंभीर प्रश्नांची गुंतागुंत त्यातून समोर येते. 

आणखी एक वेगळी परंतु ह्या विषयाशी संबंधित अशी एक घटना आहे: प्रोफेसर कॉर्नेल वेस्ट ह्या राजकीय अ‍ॅक्टिव्हिस्ट – विचारवंताला कायमस्वरूपी व्याख्यातापद देण्याचे हार्वर्ड विद्यापीठाने नुकतेच नाकारले. ह्या धक्कादायक घटनेबद्दल बरेच काही लिहिले गेले आहे आणि जगभरातील शिक्षणक्षेत्रातील प्रगतीशील विचारसरणीच्या व्यक्तींनी ह्याचा निषेधही केला आहे. ह्यापैकी एक महत्वाची टिप्पणी आहे ती सूरज येंगडे ह्यांची. सूरज येंगडे हे हार्वर्डमध्ये पोस्ट – डॉक्टरल (पीएचडी पदव्युत्तर) फेलो आहेत. कास्ट मॅटर्स’ ह्या पुस्तकाचे ते लेखक आहेत. त्यांनी दलित – काळे दृढ ऐक्य नेटवर्क निर्माण करण्यासाठी प्रोफेसर कॉर्नेल वेस्ट ह्यांच्याबरोबर काम केले आहे. दृढ ऐक्य हा एक महत्वाचा राजकीय कार्यमार्ग आहे. जगभरातील समाजाच्या परिघावरील आणि दडपल्या गेलेल्या समुदायांना सामाजिक न्याय आणि प्रतिष्ठा ह्यासाठी एकत्र येऊन लढण्यासाठी हे आवाहन आहे.

तरीदेखील एक प्रश्न उरतोच: ऐक्य म्हणजे समतेचे प्रयत्न की तटस्थता? दृढ ऐक्य म्हणजे केवळ स्वत:ला बरे वाटण्यासाठी दयाबुद्धीने केलेली तोंडदेखली कृती नव्हे तर दृढ ऐक्य म्हणजे एक हक्क आहे. तो प्रयासपूर्वक मिळवावा लागतो.

रश्मी सहानी


       
Tags: madamchiefministerourcitiesprabuddhbharatrashmisahaanirichachaddha
Previous Post

मेरी कोशिश है की ये सूरत बदलनी चाहिए

Next Post

जाणिवा समृद्ध करणारी “पटेली”

Next Post
pateli

जाणिवा समृद्ध करणारी “पटेली”

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसवर गंभीर आरोप; अनुसूचित जातींच्या बनावट सर्वेक्षणाचा कट ‎
बातमी

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसवर गंभीर आरोप; अनुसूचित जातींच्या बनावट सर्वेक्षणाचा कट ‎

by mosami kewat
July 6, 2025
0

कर्नाटक : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस पक्षावर कर्नाटकात अनुसूचित जातींच्या (SC) संदर्भात बनावट सर्वेक्षण करत असल्याचा...

Read moreDetails
यांना संविधान आणि समता दोन्हीही खूपत आहेत

यांना संविधान आणि समता दोन्हीही खूपत आहेत

July 6, 2025
Ashadhi Ekadashi 2025 :वंचित बहुजन आघाडीकडून आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांना पाणी वाटप ‎ ‎

Ashadhi Ekadashi 2025 :वंचित बहुजन आघाडीकडून आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांना पाणी वाटप ‎ ‎

July 6, 2025
Somnath Suryawanshi Case : सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरण ; मुख्यमंत्री फडणवीसांनी जनतेची माफी मागावी

Somnath Suryawanshi Case : सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरण ; मुख्यमंत्री फडणवीसांनी जनतेची माफी मागावी

July 6, 2025
तिसऱ्या भाषेच्या सक्तीला वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध; ॲड. प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीवरही साधला निशाणा‎

तिसऱ्या भाषेच्या सक्तीला वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध; ॲड. प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीवरही साधला निशाणा‎

July 6, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क