पुणे : बावधन पोलिसांनी वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात तिचा पती, सासरा, सासू, दीर आणि नणंद यांच्यासह एकूण अकरा आरोपींविरोधात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अलिशा बागल यांच्या न्यायालयात 1670 पानांचे सविस्तर आरोपपत्र दाखल केले आहे. पोलिसांनी या आरोपपत्रात 11 आरोपींविरोधात ठोस पुरावे असल्याचा दावा केला आहे. वैष्णवीच्या आत्महत्येनंतर अवघ्या 58 दिवसांत हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
वैष्णवीला मारहाण व जाच करत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिचा पती शशांक राजेंद्र हगवणे (वय 27), सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे (वय 63), सासू लता राजेंद्र हगवणे (वय 54), नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे (वय 31), दीर सुशील राजेंद्र हगवणे (वय 27, सर्व रा. मुक्ताई गार्डनजवळ, भुकूम), वैष्णवीच्या बाळाला बेकायदा ताब्यात ठेवले.
तिच्या नातेवाईकांना पिस्तूल दाखवून धमकावल्याप्रकरणी निलेश चव्हाण (वय 35, रा. कर्वेनगर) आणि आत्महत्येच्या घटनेनंतर पसार झालेल्या राजेंद्र व सुशील हगवणेला आश्रय दिल्याप्रकरणी प्रीतम वीरकुमार पाटील (वय 47, रा. कोनगोळी, ता. निपाणी, बेळगाव, कर्नाटक), मोहन उर्फ बंडू उत्तमराव भेगडे (वय 59, रा. भेगडेवस्ती, वडगाव मावळ), बंडू लक्ष्मण फाटक (वय 55, रा. भांगरवाडी, लोणावळा), अमोल विजय जाधव (वय 35) व राहुल दशरथ जाधव (वय 45, दोघे रा. पुसेगाव, ता. खटाव, सातारा) यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
आरोपींच्या जामीन अर्जांवर सुनावणी:
सध्या येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या सहा आरोपींपैकी लता हगवणे, करिश्मा हगवणे आणि निलेश चव्हाण यांनी जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केले आहेत.
निलेश चव्हाणच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. आणि लता हगवणे आणि करिश्मा हगवणेच्या जामीन अर्जांवर 25 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. या जामीन अर्जांवरील सुनावणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच सर्व आरोपींविरोधात आरोप निश्चिती केली जाईल आणि खटल्याच्या सुनावणीला सुरुवात होईल.