मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत एक खळबळजनक घटना घडली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) ला ईमेलद्वारे बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली. या ईमेलमध्ये दावा करण्यात आला होता की, बीएसई टॉवरमध्ये चार RDX IED बॉम्ब पेरण्यात आले असून, ते दुपारी ३ वाजता स्फोटित होतील. या धमकीमुळे तात्काळ सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, हा ईमेल Comrade Pinarayi Vijayan’ या नावाने पाठवण्यात आला होता. हे नाव केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या नावाशी साधर्म्य साधणारे असल्याने पोलिसांनी या प्रकरणाची अधिक गांभीर्याने दखल घेतली.
धमकीचा ईमेल मिळताच, बीएसईच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ मुंबई पोलिसांना सूचित केले. त्यानंतर, मुंबई पोलीस दलाची पथके आणि बॉम्बशोधक व नाशक पथक (BDDS) त्वरित घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी संपूर्ण बीएसई परिसराची कसून तपासणी केली. मुंबई पोलिसांनी एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, या तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही, ज्यामुळे ही बॉम्बची धमकी खोटी असल्याचे स्पष्ट झाले.
या गंभीर धमकीसंदर्भात माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ३५१(१)(बी), ३५३(२), ३५१(३) आणि ३५१(४) अंतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी आणि त्याच्या हेतूचा शोध घेण्यासाठी सायबर क्राईम युनिटची मदत घेतली जात आहे. पोलीस या घटनेचा शोध घेत आहेत.