बुलढाणा : जिल्हा परिषद अंतर्गत मराठी पूर्व – माध्यमिक शाळांची दुरवस्था आणि शिक्षकांच्या शिकवणीच्या वेळेत मोबाईल वापराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत वंचित बहुजन आघाडीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर केले.
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव प्रशांत वाघोदे यांनी दिलेल्या निवेदनात, जिल्ह्यातील अनेक जि.प. शाळा पावसाळ्यात गळती, भेगा, पडक्या भिंती अशा जीर्ण अवस्थेत सुरू असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे, असे नमूद करण्यात आले. शैक्षणिक गुणवत्तेवरही याचा विपरीत परिणाम होत असून, पंधराव्या वित्त आयोगातून उपलब्ध निधीचा शाळा दुरुस्तीकरिता तातडीने वापर करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली.
तसेच, शिकवणीच्या वेळेत शिक्षकांकडून मोबाईलचा वापर वाढल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडथळा येत असल्याच्या तक्रारी पालकांकडून वारंवार येत असल्याचे वाघोदे यांनी सांगितले. त्यामुळे जिल्हा परिषदेकडून शिक्षणाच्या वेळेत मोबाईल वापरावर पूर्ण बंदी घालण्याचे आदेश निर्गमित करावेत, अशी ठाम मागणी निवेदनातून करण्यात आली. अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.
निवेदन सादर करताना समाधान डोंगरे (तालुका अध्यक्ष), मनोज खरात (बुलढाणा तालुका अध्यक्ष), संजय धुरंधर (चिखली तालुका अध्यक्ष), मिलिंद वानखडे (बुलढाणा शहर अध्यक्ष), बाळासाहेब भिसे (चिखली शहर अध्यक्ष), दिलीप राजभोज (बुलढाणा शहर महासचिव), विजय राऊत (बुलढाणा शहर महासचिव) यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.