भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी ‘मी हिंदू धर्मात जन्माला आलो तरी, हिंदू म्हणून मरणार नाही’, अशी ऐतिहासिक घोषणा येवला या ठिकाणी केली होती. बाबासाहेबांनी धर्मांतराच्या घोषणेसाठी येवला शहरच का निवडले? धर्मांतराची घोषणा करण्यामागे कोणती सामाजिक कारणे होती? आज येवल्यातील मुक्तिभूमीवर जे महाविहार उभे आहे ते कसे निर्माण झाले. या व इतर काही प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी डॉ. सुनिता बागुल लिखित ‘येवल्याची मुक्ति भूमी’ हे पुस्तक वाचावे लागेल. पुस्तक छोटेखानी आहे; परंतु प्रत्येक पान उपयुक्त आहे.
बाकीच्या इतर लोकांसाठी येवला म्हणजे पैठणीचे शहर एवढीच मर्यादित ओळख डोळ्यासमोर येते पण, यापेक्षाही या शहराची मोठी ओळख आहे आणि ती म्हणजे आपण या शहराला मुक्तिभूमी या नावाने ओळखतो. लेखिकेने पुस्तकाच्या सुरुवातीला येवला शहराचा इतिहास थोडक्यात मांडला आहे. मुखेडचा जो सत्याग्रह झाला होता तो पुस्तकात आहे. पांडव प्रताप या ग्रंथाची मिरवणूक शांततेत चालू असताना मुद्दाम कसा हल्ला केला गेला, विनाकारण कुरापती काढून सवर्ण लोक आपल्याला कसा त्रास देत होते, असेच हे प्रकरण वाचून जाणवेल. या प्रकरणाबाबत जो पत्रव्यवहार बाबासाहेबांसोबत झाला होता तोदेखील पुस्तकात वाचायला मिळतो.
बाबासाहेब येवला शहरात येणार आहेत म्हणून त्यांच्या सत्कार करणेबाबत (तत्कालीन भाषेत पानसुपारी) नगरपरिषदेत ठराव झाला होता. त्याची ही माहिती पुस्तकात वाचायला मिळते. पुस्तकातील माहिती अधिक संशोधनपर व्हावी म्हणून लेखिकेने ठरावाची खरी नक्कल ही नगर परिषदेमधून मिळविलेली आहे तीच पुस्तकात छापली आहे. नगरपरिषदेने बाबासाहेबांच्या सत्काराचा ठराव बहुमताने पास केला आणि येवला नगर परिषदेमार्फत तो झालाही. या सत्काराची जी कार्यक्रम पत्रिका बनवण्यात आली होती तीसुद्धा पुस्तकात छापलेली आहे.
बाबासाहेबांनी येवला येथे जे भाषण दिले होते, त्याचाही थोडक्यात आढावा पुस्तकात घेतलेला आहे. शिवाय परिषदेत जे ठराव संमत झालेले होते, ते ही नमूद केले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केल्यानंतर खळबळ माजणे स्वाभाविक होते त्यांनी धर्मांतराची घोषणा केल्यानंतर धार्मिक, सामाजिक क्षेत्रात काय परिणाम झाले होते. विविध नेत्यांचे वर्तमानपत्रांमध्ये कोणते अभिप्राय छापून आले होते. ते थोडक्यात पुस्तकात वाचायला मिळतात. धर्मांतराबाबत पं. श्री. दा. सातवळेकर संपादक पुरुषार्थ यांनी १९३५ चा पुरुषार्थाच्या अंकात’ डॉ. आंबेडकरांचे कर्तव्य’ या नावाने लेख लिहिला होता. बाबासाहेबांच्या धर्मांतर घोषणा वरची ही प्रतिक्रिया होती. सातवळेकर यांच्या या लेखाला बाबासाहेबांनी पत्र लिहून सणसणीत उत्तर दिले होते. सदर लेख आणि पत्र दोन्ही पुस्तकात वाचायला मिळतात. बाबासाहेबांनी पत्राद्वारे त्यांना जे उत्तर दिलेले आहे ते वाचून धर्मांतराची का गरज होती हे अधिकच स्पष्ट होते.
प्रत्येक वर्षी १३ ऑक्टोबर रोजी बौद्ध अनुयायी येवल्यातील मुक्तिभूमीवरील महाविहाराला आवर्जून भेट देत असतात; पण हे महाविहार काही एका रात्रीत उभे राहिलेले नाही. त्याची निर्मिती कशी झाली, कोणकोणत्या अडचणींना सामोरे जावे लागले होते, याचीही माहिती लेखिकेने पुस्तकात मांडलेली आहे.
पुस्तकाचे मुखपृष्ठ अगदी विषयाला साजेसे झालेले आहे. पुस्तकातील कव्हर २ आणि ३ वर येवल्यातील महाविहारात जे शिल्प लावलेले आहेत त्याचे रंगीत चित्र छापलेले आहे. नुसत्या मुखपृष्ठावर जरी नजर टाकली, तरी आपण विहारात फिरत आहोत, असा भास होतो. येवल्यातील महाविहाराला भेट देण्याअगोदर जर हे पुस्तक आपण वाचून गेलो, तर त्या शहराचे, महाविहाराचे ऐतिहासिक महत्त्व जास्त चांगल्या प्रकारे आपल्याला समजू शकेल, असे मला वाटते.
पुस्तकाचे नाव. – येवल्याची मुक्ती भूमी
लेखिका – डॉ. सुनिता बागुल
प्रकाशक – सुमेध प्रकाशन, पुणे.
पाने – ४०
किंमत – ५० रु मात्र.
सुशील म्हसदे
मो.९९२१२४१०२४