यवतमाळ : रमाईने ज्या सामाजिक क्रांतीसाठी त्याग केला, ती सामाजिक क्रांती पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आपली आहे. त्यासाठी सर्व समाजातील महिलांनी राजकारणात सक्रिय झाले पाहिजे असं मत वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे रमाई जयंती निमित्त आयोजित वंचित बहुजन आघाडीच्या मेळाव्यात व्यक्त केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक महिला परिषदा घेतल्या. महिला शिकलेल्या नाहीत, यांना काय राजकारण कळणार? असे त्यांनी कधीही म्हटलेले नाही. राजकारणात महिलांना सक्रिय झाल्याशिवाय, महिलांना वैचारिकदृष्ट्या जागृत केल्याशिवाय आपली सामाजिक क्रांती यशस्वी होणार नाही याची जाणीव बाबासाहेबांना होती. असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
महाड येथील महिला परिषदेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश घेऊन महिला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेल्या. त्या महिलांमधून अनेक रमाई निर्माण झाल्या. याच रमाईंनी महाराष्ट्रातील एक पिढी घडवली आहे. समाजातील एक उच्चशिक्षित आणि क्रांतिकारी, विचारांशी एकनिष्ठ कार्यकर्ता इथल्या रमाईंनी निर्माण केला आहे. त्या प्रत्येकाच्या घरात आणि विचारात रमाई असल्याचे त्यांनी नमूद केले.
जो समाज हजारो वर्ष दुःख यातना भोगत आहे, त्या समाजाच्या मुक्तीसाठी बाबासाहेब आंबेडकर हे परदेशात गेले होते, याची पूर्ण जाणीव माता रमाईला होती. म्हणून, रमाई यांनी स्वतःच्या दुःखाचे अवडंबन न करता बाबासाहेबांच्या पाठिशी आपण कसे उभे राहू, हाच त्यांचा निर्धार होता असेही त्यांनी म्हटले आहे.