ॲड. प्रकाश आंबेडकर : वंचित बहुजन आघाडी तुमच्यासाठी लढत आहे आणि लढणार
मुंबई : लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जूनला जाहीर झाला. त्याच वेळी दलितांनी कोणाला मतदान केले हे स्पष्ट झाले होते. पण, तुमच्यासाठी कोण लढतेय आणि तुमची बाजू कोण मांडतेय? ते ओळखा त्याची वास्तविकता समजून घ्या असे ट्विट वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. वंचित बहुजन आघाडी तुमच्यासाठी लढत आहे, तुमच्यासाठीच लढणार आणि यापुढेही लढत राहील, असेही यामध्ये त्यांनी म्हटले आहे.
ॲड. आंबेडकरांनी मांडलेले मुद्दे
1️- निवडणूक निकालाच्या दोन दिवसानंतर बीएमसीने पवईच्या जय भीम नगर परिसरातील 700 हून अधिक घरे पाडली.
कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते सर्वांत आधी घटनास्थळी दाखल झाले होते? तर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तिथे होते.
आमच्या मुंबईच्या टीमने या दलितविरोधी अभियानाचा निषेध तर केलाच, पण जय भीम नगरमधील विस्थापित रहिवाशांचा लढा लढण्यासाठी कायदेशीर टीमही तयार केली.
2️- पवित्र दीक्षाभूमीवरील भूमिगत पार्कींग प्रकल्पाचे काम गेल्या काही आठवड्यांपासून सुरू होते. यावर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना नेतृत्वाने एक तरी शब्द उच्चारला का? वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील बौद्धांसह या घटनेला विरोध केला आणि त्यामुळेच या प्रकल्पाला स्थगिती मिळाली. त्यानंतरच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला जाग आली.
पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हे दाखल केले, ज्यात आमचे वंचित बहुजन आघाडीचे नागपूर अध्यक्ष आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांचा समावेश होता. एवढे होऊनही त्यांच्या नेतृत्वाकडून बौद्ध आंदोलकांसाठी एकही शब्द निघाला नाही.
3️- महाराष्ट्रभरातील दलितांना घरे खाली करण्यासाठी आणि गायरान जमिनीवरील पिके काढून टाकण्यासाठी नोटिसा पाठविल्या जात होत्या. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना त्यांच्या मदतीला आले का? त्यांनी एक तरी शब्द उच्चारला का? काल मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. तसेच, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अतिक्रमण म्हणून घोषित करण्यात आलेली घरे आणि लागवडी खालील पिकांना संरक्षण मिळण्याची मागणी केली होती , जी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली.
याचबरोबर दीक्षाभूमीच्या आंदोलकांवरील गुन्हे रद्द करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणीही मुख्यमंत्र्यांनी मान्य केली. निकाल जाहीर होऊन महिना व्हायचा होता आणि तुम्ही ज्या पक्षांना मतदान केले त्या सर्व पक्षांनी तुम्हाला डावलले आहे. कुठलीही राजकीय ताकद नसताना वंचित बहुजन आघाडीने दलितांसाठी लढा दिला आणि त्यांनी एक शब्दही काढला नाही.
ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे की, फक्त कल्पना करा, महाराष्ट्रातील राजकीय सत्ता वंचित बहुजन आघाडीच्या हाती आल्यास काय होऊ शकते. फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचा मुखवटा घालणाऱ्यांपासून सावध राहा. हे पावसाळ्यात निघणाऱ्या किड्यांसारखे आहेत. निवडणुका संपल्या आणि हे गायब होतात.