डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महासुर्याच्या व्यक्तिमत्वाआधी…
जिवंत माणसाला माणुस म्हणुन वागविण्याच्या सामाजिक क्रांतीआधी…
पिढ्यानपिढया जात नावाचं अमानवी व रानटी मनूधर्माचं वास्तव…
आणि पुरुषसत्ताक व्यवस्थेतील अघोरी स्त्री-दास्याचा विस्तव…
सापासारखं फणा काढून डसत होतं…
विंचवासारखं डंख मारत होतं…
भेदभावाच्या काळ्या अंधारात मानवी सभ्यतेला जाळत होतं…
तेव्हा निसर्गालाचं जणु काही अमानवतेचा तिरस्कार वाटला..
समतेचा महासूर्य युगांना प्रकाशित करण्या भारतभूमीवर जन्मला..
ही शतकांची घुमसट मुक्त करण्यासाठी…
गुदमरलेल्या श्वासांना मोकळं करण्यासाठी…
आभाळाने नाकारलेल्यांना उभारी देण्यासाठी…
समतेचं आकाश पाखरांना खुलं करण्यासाठी…
अस्पृश्यतेच्या दाहक चटक्यात भीम जन्मलेला होता..
पाऊलोपाऊली अत्याचाराचा बांध त्याला आडवा होता..
या साऱ्या अनिष्ट रुढीला जाळत त्यानं माणूसपण कमावलं…
गावकुसाबाहेरच्या कित्येक पिढ्यांचं माणुसपण अजरामर केलं…
जातीच्या विषारी सापाला लेखणीच्या व समानतेच्या जोरावर भुईमधी कायमचं गाडलं…
काळोख्या वस्तीतल्या माणसाला उजेडाची किरणांना डोकं वर करून कायमचं पाहता आलं…
इथं मुळातच माणसांचं माणूसपण नाकारलं गेलं होतं…
जात ही सवर्णांनी निर्मिलेली समस्या हे भिमान हेरलं होतं…
त्यानं फक्त अस्पृश्य माणसालाच माणूसपण दिलं नव्हतं…
सवर्णांच्या धर्मषड्यंत्रयाला अमानवी म्हणुन हेरलं होतं…
शोषकांच्या संरचनेवर बोट ठेवत शोषितांना प्रतिनिधित्व दिलं…
समतेच्या न्यायाचं तत्व जातीअंतासाठी देशाला दिलं…
– आदिती गांजापूरकर, नांदेड