पॅरिस : फ्रान्समध्ये सरकारविरोधात जनतेचा तीव्र उद्रेक पाहायला मिळत आहे. नेपाळमधील जनआंदोलनानंतर आता फ्रान्समध्येही नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले असून, त्यांनी ठिकठिकाणी हिंसाचार केला आहे. राष्ट्रपती इमॅन्युएल माक्राँ यांनी निवडलेले नवे पंतप्रधान सेबॅस्टिन लेकोर्नू यांना जनतेचा तीव्र विरोध असल्यामुळे हा हिंसाचार भडकला आहे.
बुधवारी पॅरिसमध्ये ‘ब्लॉक एव्हरीथिंग’ या संघटनेच्या नेतृत्वाखाली देशव्यापी आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी शहरातील प्रमुख रस्ते अडवून जाळपोळ केली. अनेक ठिकाणी वीजवाहिन्या पेटवून दिल्यामुळे रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाली. वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेनेस शहरात एका बसला आग लावण्यात आली, ज्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
राष्ट्राध्यक्ष माक्राँ यांनी विश्वासदर्शक ठरावात पराभूत झालेले पंतप्रधान फ्राँस्वा बायरो यांच्या जागी सेबॅस्टिन लेकोर्नू यांची नियुक्ती केली आहे. मात्र, नागरिकांनी लेकोर्नू यांना थेट विरोध दर्शवला असून, माक्राँ यांच्या निर्णयावरही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. केवळ नव्या पंतप्रधानांविरोधातच नव्हे, तर अर्थसंकल्पात केलेली कपात आणि इतर सरकारी धोरणांविरोधातही लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे.
या आंदोलनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने सुमारे ८० हजार पोलीस तैनात केले होते. परिस्थिती चिघळल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर केला. या दरम्यान, देशभरातून सुमारे २५० आंदोलकांना अटक करण्यात आल्याचे गृह मंत्रालयाने सांगितले आहे. पॅरिसमधील आंदोलकांनी शहराच्या बेल्टवे वाहतुकीला वारंवार अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती. फ्रान्समधील हे आंदोलन माक्राँ यांच्या सरकारसाठी एक मोठे आव्हान बनले आहे.