बीड : नेकनूर येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने “मोदी हटाव, देश बचाव” या घोषवाक्याखाली भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारच्या विविध धोरणांविरोधात तसेच राष्ट्रीय व सामाजिक प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले.
आंदोलनाची सुरुवात भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी देशात धार्मिक ध्रुवीकरण वाढत असल्याचा आरोप करत संविधानातील मूलभूत अधिकारांचे संरक्षण करण्याची मागणी केली. (Beed Protest News)
तसेच निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरद्वारे मतदान व्यवस्था लागू करावी, अशी मागणीही आंदोलकांनी केली. याशिवाय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयश आल्याने नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

आंदोलनातून काही प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या. त्यामध्ये महाबोधी महाविहार बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावा, शेतकऱ्यांच्या हिताला बाधा आणणाऱ्या परदेशी व्यापार करारांचा पुनर्विचार करावा तसेच विविध संशयास्पद प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करावी, अशा मागण्यांचा समावेश होता. (Beed Protest News)
हे आंदोलन वंचित बहुजन आघाडी बीड जिल्हा पश्चिमचे जिल्हाध्यक्ष अजय सरवदे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. यावेळी ऑल इंडिया पँथर सेनाचे जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांच्यासह बाळासाहेब मोरे, गोरक्षनाथ कदम, रायचंद कापसे, रोशन धिवार, मयुर निर्मळ, दिनेश अविळे, रवि गायकवाड, बबलू गायकवाड, ओम करे, अशोक करडे, संजय ढोकने, दिपक भालेराव, विशाल इंगोले, नितीन पायाळ, मुना दुनघव, फुलचंद वारभवन, अर्जुन धनवे, लखन जोगदंड, मिलिंद सरपते आदी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. (Beed Protest News)
आंदोलन शांततेत पार पडले असून आंदोलकांच्या वतीने प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व बालाघाट परिसरातील नेते सतीश पायाळ यांनी या रस्ता रोको आंदोलनाचे शिस्तबद्ध नियोजन केले असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.






