सातारा : वंचित बहुजन आघाडीच्या पुणे विभागीय संघटनात्मक कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी २ ऑक्टोबर २०२६ रोजी सातारा येथे विभागीय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रदेश कमिटी सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होणार आहे.
ही बैठक २ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता सुरभि मंगल कार्यालय, नॅशनल हायवे रोड, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा येथे आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांतील संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेण्यात येणार आहे. जिल्हा, शहर, तालुका, सर्कल, ग्राम, वॉर्ड तसेच बूथ स्तरावरील संघटनात्मक बांधणीची स्थिती, शाखा व बूथ कमिटीची निर्मिती आणि नियुक्त केलेल्या कार्यकारिण्यांच्या याद्यांचा आढावा बैठकीत घेतला जाणार आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीच्या पॅरेंट बॉडी, महिला आघाडी, युवा आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन, विद्वत सभा, माथाडी कामगार संघटना यांसह विविध विंगच्या संघटनात्मक कामकाजाचाही आढावा घेतला जाणार आहे. संबंधित विंगच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या कामाचा लेखी अहवाल बैठकीत सादर करणे आवश्यक असल्याचे कळविण्यात आले आहे.
प्रत्येक जिल्हा, शहर आणि तालुका कार्यकारिणीचा अहवाल संबंधित विंगच्या जिल्हाध्यक्ष व महासचिवांनी लेखी स्वरूपात सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. या बैठकीस सर्व पॅरेंट बॉडी, महिला आघाडी, युवा आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन, विद्वत सभा, माथाडी कामगार संघटना तसेच विविध विंगचे जिल्हा व शहर पदाधिकारी यांनी वेळेवर आणि अनिवार्यपणे उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश महासचिव प्रा. सोमनाथ साळुंके यांनी केले आहे.





