दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनास वंचितचा पाठिंबा !
गडचिरोली: भारतातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला किमान हमीभाव मिळावा यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन पाठविण्यात आले. पंतप्रधान मोदी यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राजधानी दिल्लीमध्ये परत एकदा देशातील शेतकऱ्यांनी न्याय मागण्यासाठी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे, या आंदोलक शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे ती “किमान आधारभूत किंमत” हा त्यांचा हक्क मानला जावून ती देण्यास सरकार बांधील आहे असा कायदा केला जावा.
परंतु सरकारला हे मान्य नाही त्यामूळे देशात किमान हमीभाव मिळावा यासाठी तिव्र आंदोलन सुरू आहे, देशातील फक्त सहा टक्के शेतकऱ्यांना किमान हमीभाव मिळतो हे विदारक सत्य असून आडत व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांचे प्रचंड शोषण होत आहे. केंद्र सरकारने आणि त्याच्या नेतृत्वातील महाराष्ट्र राज्य सरकारने आणलेल्या कृषी कायद्यामूळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल बाजार समित्यां बाहेर विकता येणार आहे, पण जर शेतकरी हा शेतमाल बाजार समित्यांबाहेर विकणार असेल तर तिथं त्या मालाची खरेदी सरकारी भावानं होईल याची हमी नाही, किमान हमी भावाचा मुद्दा हा एपीएमसी कायद्यात ज्या तिन दुरूस्त्या केल्या त्याच्याशी निगडीत आहे या तिन्ही कायद्यामूळे शेतकऱ्यांसमोर धोके निर्माण झाले आहेत.
शेतकऱ्यांना किमान हमी भाव मिळावा आणि त्या हमी भावाची कडक अमंलबजावणी होण्याच्या दृष्टीने ज्या एपीएमसीच्या आवारात हमीभावापेक्षा कमी किंमतीने खरेदी होईल त्या मार्केट कमिटीच्या संचालका विरूध्द कायदेशीर कारवाई करावी, तसेच व्यापारी अथवा अडत्या दोषी असल्यास त्यांना तुरूंगवास व आर्थिक दंड करावा आणि त्यासाठी कायदा तयार करावा अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच दिल्लीतील शेतक-यांच्या आंदोलनास वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा असल्याचेही म्हटले आहे.
यावेळी, जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे, जिल्हा उपाध्यक्ष जी के बारसिंगे, तालुकाध्यक्ष बाशिद शेख, सोशल मिडीया प्रमुख जावेद शेख, युवक आघाडी जिल्हा उपाध्यक्ष कवडू दुधे, शहराध्यक्ष दिलीप बांबोळे, शहर संगटक विपीन सूर्यवंशी, वासूदेव मडावी, किशोर जाधव, कैलास खोब्रागडे आदि उपस्थित होते.