नाशिक : पाथर्डी गावातील दोंदे मळ्यातील रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असून, यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसामुळे खड्डे मोठे झाले असून, त्यात पाणी साचल्याने आरोग्याच्या समस्याही निर्माण झाल्या आहेत. या प्रश्नावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी वंचित बहुजन युवक आघाडीने केली आहे. त्यांनी याबाबत विभागीय आयुक्तांना निवेदन दिले असून, लवकरच रस्ता दुरुस्त न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.
दोंदे मळ्यातील रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून खचलेल्या अवस्थेत आहे. रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून, पावसाळ्यात त्यात पाणी साचते. यामुळे विद्यार्थी, नोकरदार आणि इतर नागरिकांना ये-जा करताना मोठी गैरसोय होत आहे. साचलेल्या पाण्यामुळे डास देखील वाढले असून, साथीचे आजार पसरण्याची भीती आहे. याचा सर्वाधिक फटका महिला आणि लहान मुलांना बसत आहे.
या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन युवक आघाडीने पुढाकार घेतला आहे. नाशिक तालुका अध्यक्ष विकी वाकळे, महासचिव संतोष वाघ आणि पाथर्डी शाखा प्रमुख आदित्य दोंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज विभागीय आयुक्त कार्यालयात निवेदन सादर केले.
निवेदनात त्यांनी महापालिकेने तातडीने नवीन रस्ता तयार करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे. जर या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास, वंचित बहुजन युवक आघाडीच्या माध्यमातून मोठे आंदोलन उभे केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी धमदीप कडू मोरे, बजरंग आसाराम भोले, सुनील रामजी गायकवाड, भारत अभिमान दवंडे, सुंदर खरात, विलास तायमन, चंदर उघडे, बबन कांबळे, रामेश्वर नामदेव सहार, अतुल काळे, साई ताकतोडे यांच्यासह परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते.
बोधीगया महाविहार बौद्ध धर्मीयांच्या नियंत्रणाखाली येईपर्यंत लढा सुरूच राहील; राजकीय नेत्यांच्या ‘मौना’वर ॲड. प्रकाश आंबेडकर यांची तीव्र टीका
मुंबई : बोधगया येथील जागतिक स्तरावरील पवित्र बौद्ध स्थळ असलेल्या महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्ध धर्मीयांच्या नियंत्रणाखाली येत नाही, तोपर्यंत वंचित...
Read moreDetails