उस्मानाबाद : अनुसूचित जातीसाठी केंद्र सरकारने मंजूर केलेल्या १७००० कोटी निधीचा योग्य वापर न होण्याच्या निषेधार्थ आणि तत्काळ अंमलबजावणीसाठी हमी देण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, उस्मानाबाद जिल्हा कार्यालयाला निवेदन देण्यात आले.
केंद्र सरकारने अनुसूचित जातींच्या व्यवसाय, शिक्षण व स्वयंपूर्णतेसाठी १७ हजार कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारकडे वर्ग केला आहे. मात्र, राज्य शासनाने आवश्यक हमी न दिल्यामुळे हा निधी अद्याप वापरात येऊ शकलेला नाही. त्यामुळे लाखो अनुसूचित जातीतील युवक-युवती, व्यावसायिक आणि विद्यार्थी योजनांच्या लाभापासून वंचित राहिले असून त्यांना आर्थिक व सामाजिक नुकसान सहन करावे लागत आहे, असा आरोप निवेदनात करण्यात आला.
यावेळी वंचित बहुजन युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शितल चव्हाण, जिल्हा संघटक बाबा वाघमारे, धाराशिव तालुका अध्यक्ष सागर चंदनशिवे, तालुका संघटक मनीष कांबळे, कळंब तालुका महासचिव मिलिंद खुणे, तालुका युवा उपाध्यक्ष मोहन वाघमारे, तालुका सचिव महेश भीडबाग, युवक तालुका सदस्य बालाजी राऊत, युवक शहराध्यक्ष संतोष साबळे, ॲड. जिल्हा उपाध्यक्ष एल. जी. खुणे, अमन मुद्दे व युवक आघाडीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
या निवेदनातून राज्य शासनाने तत्काळ हमी देऊन निधीची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली असून, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही वंचित बहुजन युवक आघाडीने दिला आहे.