मुंबई : वंचित बहुजन आघाडीने आगामी निवडणुकांसाठी दिलेला ‘एक संधी वंचितला’ हा निर्धार आता केवळ राजकीय सभांपुरता मर्यादित न राहता कौटुंबिक आणि सामाजिक सोहळ्यांमध्येही पोहचला आहे. मुंबईत एका विवाह सोहळ्यात नवदाम्पत्याला चक्क पक्षाच्या विजयाचा नारा असलेले पोस्टर भेट देऊन शुभेच्छा देण्यात आल्याने, या आगळ्यावेगळ्या राजकीय प्रचाराची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सध्या पक्षवाढीसाठी नवनवीन संकल्पना राबवताना दिसत आहेत. याचाच एक भाग म्हणून, मुंबईतील ज्योती स्वप्नील वाघमारे यांच्या वतीने एका मंगल परिणयाचे औचित्य साधून पक्षाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात आला.

शुभेच्छांसोबतच राजकीय संदेश
विवाह सोहळ्यात उपस्थित असलेल्या धारक आणि दारीका (वर-वधू) यांना शुभेच्छा देताना, त्यांना ‘एक संधी वंचितला’ हे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत विजय स्लोगन असलेले पोस्टर भेट म्हणून देण्यात आले.
सहसा लग्नात भेटवस्तू म्हणून गृहोपयोगी वस्तू किंवा फुले दिली जातात, मात्र राजकीय ध्येय समोर ठेवून देण्यात आलेल्या या पोस्टरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.





