यवतमाळ : यवतमाळ नगर परिषदेने पावसाळा पूर्व कामे योग्यरित्या न केल्यामुळे पावसाचे पाणी घरात घुसल्याने नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. आंबेडकर नगर, विटभट्टी, भोसा, साने गुरुजी, आठवले लेआऊट, लोहारा आणि शहरातील इतरही भागांना पावसाचा फटका बसला आहे.
यवतमाळ शहरातील सिमेंटचे रस्ते उंच झाल्यामुळे शहरातील नागरिकांच्या घरात पाणी जात असल्याच्या तक्रारी आल्यानंतर वंचित बहुजन आघाडी यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष डॉ. नीरज वाघमारे यांनी शिष्टमंडळासह नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन शहरातील समस्यांचे निवेदन दिले.
तसेच, समस्या तत्काळ दूर करण्यासाठी दोन दिवसाचा अल्टिमेटम देण्यात आला. याशिवाय दोन दिवसात समस्या मार्गी न लागल्यास व्यापक जनआंदोलन उभे करण्याचा इशारा वाघमारे यांनी नगर परिषद प्रशासनाला दिला आहे.
या प्रसंगी महिला जिल्हाध्यक्षा धम्मवती वासनिक, पुष्पाताई शिरसाट, भारतीताई सावते, मीना रणीत, विशाल पोले, अरुण कपिले, शैलेश भानवे, विवेक वाघमारे, भोजराज निमसरकार, गजू सावळे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.