लातूर : लातूर शहरातील महानगरपालिका निवडणूक निकालात वंचित बहुजन आघाडीने घवघवीत यश मिळवत आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. एकूण ५ पैकी ४ जागा जिंकत वंचितने अक्षरशः मैदान मारले असून, या निकालामुळे प्रस्थापितांना जोरदार धक्का बसला.
अमोल लांडगे यांच्या नावाने वंचित बहुजन आघाडीचे विजयाचे पहिले खाते उघडले. प्रभाग क्रमांक १३ अ मधून अमोल लांडगे यांनी विजय संपादन केला. या विजयानंतर त्यांनी पत्रकारांशी आपले मत मांडले. बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले. भावुक होताना त्यांनी ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे आभार मानले.
प्रभाग क्रमांक ०४ अ मधून सचिन अर्जुन गायकवाड यांनी मतदारांचा विश्वास संपादन करत बाजी मारली. प्रभाग क्रमांक ०७ मधून निकिता रोहित सोमवंशी यांनी दणदणीत विजय मिळवला, तर प्रभाग क्रमांक ०२ अ मधून अंकिता प्रशांत भडीकर यांनी विजयी घोडदौड कायम ठेवली.
या चारही प्रभागांतील विजयामुळे वंचित बहुजन आघाडीचा शहरातून मोठा जल्लोष करण्यात आले. तसेच या दणदणीत विजयानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. विजयानंतर समर्थकांनी जल्लोष करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
या निकालामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात वंचित बहुजन आघाडीची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






