अकोला : अकोला जिल्ह्यातील तेल्हारा, मुर्तीजापुर, अकोट, बाळापूर या नगरपरिषदा आणि हिवरखेड, पातुर, बार्शीटाकळी या नगरपंचायतीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने तयारी सुरू केली आहे. ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार, वंचित बहुजन आघाडीकडून नगराध्यक्ष आणि सदस्य पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे.
दिनांक 13 ऑक्टोबर 2025 पासून ते 20 ऑक्टोंबर 2025 पर्यंत दररोज दुपारी 01 ते 04 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील. हे अर्ज वंचित बहुजन आघाडीच्या पक्ष कार्यालय, टावर चौक, अकोला येथे उपलब्ध असून तिथेच ते स्वीकारले जात आहेत.
आज रोजी पक्षाच्या कार्यालयात अनेक इच्छुक उमेदवारांनी अकोला जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे यांच्याकडून उमेदवारी अर्ज घेतले. नगराध्यक्ष आणि सदस्य पदांचे आरक्षण जाहीर झाल्यामुळे इच्छुकांच्यात नवचैतन्य निर्माण झाले आहे. त्यामुळे अकोला येथील पक्ष कार्यालयात उमेदवारी अर्ज घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.