मीरा भाईंदर : मीरा-भाईंदरमध्ये काशिगाव पोलीस चौकीच्या आवारात, तेही वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या समोर, काही कथित संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुस्लिम समाजाबद्दल अवमानकारक, भडकावू आणि सामाजिक तणाव निर्माण करणारे वक्तव्य केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या धक्कादायक घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी, तसेच बहुजन आणि मुस्लिम समाजातील नागरिकांनी काशिगाव पोलीस चौकीवर शांततामय आंदोलन छेडले.
या संपूर्ण आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडी मीरा-भाईंदर जिल्हाध्यक्ष इकबाल महाडिक यांनी केले. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “हा महाराष्ट्र शिव–फुले–शाहू–आंबेडकरांच्या विचारांचा प्रगत राज्य आहे. येथे हिंदू–मुस्लिम ऐक्य हा आपला पाया आहे. पोलीस चौकीतच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अवमानास्पद वक्तव्य होणे अत्यंत गंभीर असून अशा कृत्याला आम्ही कधीही सहन करणार नाही.”
या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे महासचिव अनिल भगत, पंकज इंगोले यांच्यासह मोठ्या संख्येने बहुजन आणि मुस्लिम बांधव सहभागी झाले.
आंदोलनकर्त्यांनी आरोप केला की, पोलीस चौकीसारख्या संवेदनशील आणि कायदेशीर परिसरातच धार्मिक द्वेषाचे वक्तव्य होणे हा कायदा-सुव्यवस्थेचा भंग असून, संबंधित लोकांवर भारतीय न्याय संहितेनुसार तात्काळ गुन्हा दाखल केला गेला पाहिजे. अन्यथा पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
शहरातील शांतता, सामाजिक सलोखा आणि संविधानिक मूल्यांचे रक्षण करण्याच्या उद्देशाने हे आंदोलन करण्यात आले असून, भविष्यातही शहरात धार्मिक तणाव निर्माण करण्याचा कोणताही प्रयत्न झाल्यास कायदेशीर आणि ठाम लढा उभारला जाईल, असे वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट केले.





